आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा गंगापूर धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला २३ वर्षांपेक्षा जादा काळ झाल्याने वारंवार गळती हाेऊन पाणीपुरवठा विस्कळीत हाेत आहे. त्यामुळे आता गंगापूर धरणातून बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची १२.५० किलोमीटर लांबीची लोखंडी जलवाहिनी टाकण्यासाठी २११ कोटींचा प्रस्ताव महासभेत सादर करण्यात येणार आहे. तसेच या याेजनेच्या तांत्रिक तपासणीसाठी जीवन प्राधिकरणाला एक काेटी ८६ लाखांचे शुल्क अदा करावे लागणार असून त्याचीही मंजुरी गुरुवारी (दि. २) हाेणाऱ्या महासभेवर ठेवण्यात आली आहे.
शहराला गंगापूर धरण समूह व काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरणातून पंपिंग स्टेशनद्वारे बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाते. यासाठी सन १९९७ ते २००० दरम्यान १२०० मिमी व्यासाच्या दोन सिमेंटच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. गेल्या २३ वर्षांत या जलवाहिनीची वहन क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. सध्याची लोकसंख्येची मागणी पूर्ण करण्यासाठी जलवाहिनी सक्षम नसून जुनी झाल्याने वारंवार गळतीची समस्या उद्भवत आहे. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करावा लागत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान नवी लोखंडी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्राच्या १५व्या वित्त आयोगाचा निधी देखील मंजूर झाला आहे. या प्रकल्पासाठी २०९ कोटी ६० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला महासभेने यापूर्वीच मंजूरी दिली असून सल्लागार नेमून सविस्तर प्रकल्प अहवालदेखील तयार करण्यात आला. मात्र शासनाच्या निर्देशांनुसार जीवन प्राधिकरण विभागामार्फत तांत्रिक तपासणी करणे बंधनकारक असल्याने महापालिकेने यासंदर्भातील प्रस्ताव पाठविला. या तपासणीसाठी १.८६ कोटींचे शुल्क प्राधीकरणाला द्यावे लागणार आहे. हे शुल्क देण्याचा प्रस्ताव गुरुवारी (दि. २) होणाऱ्या महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
..अशी असेल नवी थेट जलवाहिनी
गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र १२.५० किमी लोखंडी जलवाहिनी ४०० एमएलडी क्षमतेची १८०० मिमी व्यासाची जलवाहिनी केंद्राच्या वित्त आयोगाच्या निधीतून २०९.६० कोटींची योजना २०४१च्या पाणी आरक्षणानुसार व २०५५च्या लोकसंख्येनुसार जलवाहिनीची क्षमता
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.