आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीटंचाई:पाथर्डी फाटा परिसरात पाणीटंचाई; पुरवठा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

इंदिरानगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा गंगापूरसह मुकणे धरणात मुबलक पाणी उपलब्ध असतानाही शहरातील काही भागांमध्ये नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाथर्डी फाटा, चेतनानगर, राणेनगर, वासननगर, आनंदनगर या भागासह पाथर्डी गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसत आहे.

यााबाबत वारंवार तक्रारी करूनही पालिका अधिकाऱ्यांकडून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने या परिसरातील रहिवाशी त्रस्त आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पाणीप्रश्न मार्गी लागला नाही, तर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा माजी लोक प्रतिनिधींसह स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

पाथर्डी फाटा येथील जलकुंभातून पाण्याचे वितरण होते. या जलकुंभ परिसरात सकाळच्यावेळी माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड व साहेबराव आव्हाड यांनी स्थानिक नागरिकांसह भेट देऊन पाहणी केली असता जलकुंभात आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध नसल्याचे लक्षात आले. सुरळीत पाण्यासाठी सहा मीटर पाण्याची लेव्हल हवी. मात्र, तेवढे पाणीच येत नाही. या भागासाठी मुकणे धरणातून पाणी येत असले तरी जलकुंभ भरले जात नाहीत.

त्यामुळे वासननगर, चेतनानगर, आनंदनगर, चढ्ढा पार्क या टाक्या न भरल्यामुळे प्रभागात कमी दाबाने पाणी येते. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. या भागामध्ये खूप कमी दाबाने पाणी येते. पाथर्डी फाटा येथून पाण्याचा पुरवठा होतो, तेथे पाहणी करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.