आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक शहराचा तसेच पर्यायाने मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या गंगापूर धरणाजवळ असलेल्या किकवी पेयजल प्रकल्प तसेच उर्ध्व गोदावरी प्रकल्प, कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी, आंबोली वेळुंजे या प्रवाही योजना, पार गोदावरी उपसा जोड योजना मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित सर्व प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेवून ही कामे तात्काळ मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट केले. राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून ही बैठक झाली.
जोड योजनांना गती
अति पावसाचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी मध्यंतरीच्या काळामध्ये ठोस प्रकल्प झाले नाही. मात्र, आता उर्ध्व गोदावरी प्रकल्प प्रस्ताव,कळमुस्ते, चिमणपाडा,अंबड,कापवाडी,आंबोली वेळुंजे या प्रवाही योजना, किकवी पेयजल प्रकल्प व पार गोदावरी उपसा जोड योजनांच्या कामांना गती दिली जात आहे. या योजनांचे प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समिती,नियोजन विभाग अशा वेगवेगळया पातळीवर प्रस्ताव प्रलंबित आहेत त्यामध्ये असणा-या त्रुटी दूर करून ही कामे मंजूर करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून एक उच्चस्तरीय बैठक घेऊन कारवाई करावी, असे आदेश जलसंपदा मंत्री पाटील यांनी दिले. या बैठकीला भुजबळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत,लाभक्षेत्र विकास सचिव किरण कुलकर्णी,सहसचिव अतुल कपोते, अहमदनगरचे अधिक्षक अभियंता अरूण नाईक,कार्यकारी अभियंता संगीता जगताप उपस्थित होते.
सुधारित प्रशासकीय मान्यता द्या
भुजबळ म्हणाले की जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यास ऊर्ध्वं गोदावरी प्रकल्पाअंतर्गतची दिंडोरी तालुक्यातील धोंडाळपाडा, ननाशी, मांजरपाडा (देवसाने), गोळशी महाजे, यासह इतर प्रवाही वळण योजना,तसेच पुणेगाव दरसवाडी आणि दरसवाडी-डोंगरगाव कालवा विस्तारीकरण आणि ओझरखेड डावा कालव्याची अपूर्णं कामे मार्गी लागतील. कळमुस्ते,चिमणपाडा, अंबड, कापवाडी या प्रवाही योजनांना प्रशासकीय मान्यता तर नाशिक शहराच्या भविष्यातील पाण्यासाठी किकवी पेयजल प्रकल्पालाही सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावे अशी मागणी केली. पार गोदावरी उपसा जोड योजनेमुळे पूर्वेकडे वाहून जाणारे पाणी पश्चिमेकडे गोदावरी खोऱ्यात आणले जाणार आहे.या योजनेत धरणे एकमेकांशी नैसर्गिक उताराने बोगदा व बंद नलीकांद्वारे जोडून मध्यवर्ती धरणाच्या पाणीसाठ्यातून पाण्याचा उपसा करण्याचे नियोजन आहे. सर्व धरणे एकमेकांस समान संचय पातळीत जोडण्यात येणार असल्यामुळे साठ्यांचे एकात्मिक जलनियोजन त्यामुळे शक्य होणार आहे.गोदावरी खो-यातील पाण्याची तुट भरून काढण्यासाठी पार -गोदावरी उपसा जोड योजना क्रमांक ३ व ४ मंजूर करावे अशी मागणी शेवटी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.