आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:1324 कोटींचा कोळसा गेला कुठे? कोळसा बिलांच्या थकबाकीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर, केंद्र आणि राज्यात कलगीतुरा

दीप्ती राऊत | नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोळसा टंचाईच्या झळांमुळे वीज ग्राहकांवर भारनियमनाची टांगती तलवार असताना केंद्र विरुद्ध राज्य सरकार या राजकीय नाट्याचा नवीन अंक पुढे येत आहे. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात खरेदी केलेल्या कोळशापोटी तब्बल २,१८६ कोटी रुपयांची रक्कम महाजनकोकडे बाकी असल्याचा केंद्र सरकारच्या कोल इंडिया या कंपनीचा अहवाल आहे. दुसरीकडे, आपली थकबाकी केवळ ८६२ कोटींची असल्याचे महाराष्ट्राच्या ऊर्जा खात्याचे म्हणणे आहे. या नवीन वादात १,३२४ कोटींचा कोळसा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याची माहिती "दिव्य मराठी'च्या हाती आली आहे.

महाजनकोला ३.७० कोटी टन कोळसा
केंद्र सरकारची कोल इंडिया कंपनी इतर वीजनिर्मिती कंपन्यांशी करारानुसार कोळशाचा पुरवठा करते. चालू वर्षात कोल इंडियाने महाजनको या महाराष्ट्र सरकारच्या वीजनिर्मिती कंपनीला ३ कोटी ७० लाख टन कोळसा पुरवला आहे. गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्राला पुरवलेल्या कोळशाच्या बिलापोटी २,१८६ कोटींची थकबाकी असल्याचा कोल इंंडियाचा अहवाल आहे.

सर्वांकडे १३,९८० कोटींची थकबाकी
२१ राज्यांच्या वीज कंपन्या व केंद्राच्या अधिपत्याखालील १३ अशा ३४ कंपन्यांना कोल इंडिया कोळसा पुरवते. या साऱ्यांची मिळून १३,९८० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात महाराष्ट्राची थकबाकी देशात सर्वाधिक म्हणजे २,१८६ कोटी असल्याचा कोल इंडियाचा अहवाल आहे.

राज्याला हवा तेव्हा कोळसा नाही पुरवला, एवढी थकबाकी नाहीच
महाजनकोची थकबाकी ८६२ कोटींचीच आहे. त्यांच्याकडे नोंद झाली नसेल. हे संकट केंद्राच्या कोळसा व रेल्वे मंत्रालयाच्या गैरव्यवस्थापनामुळे निर्माण झाले आहे. कोळसा मिळाला तेव्हा रॅक नव्हत्या, रॅक होत्या तेव्हा कोळसा नव्हता. याला केंद्रच जबाबदार आहे. भाजपशासित राज्यांतही भारनियमन सुरू आहे. महाराष्ट्राने काटेकोर नियोजन करून जनतेवर भारनियमन लादलेले नाही, हे लक्षात घ्यावे. आम्ही मागितला तेवढा कोळसा केंद्राने दिलाच नाही.'
- डॉ. नितीन राऊत, ऊर्जामंत्री महाराष्ट्र

थकबाकी असली तरी कोळसा देतोय, आकड्यात खेळण्यापेक्षा प्रश्न मिटवा
या थकबाकीमुळे महाराष्ट्र सरकारकडे पैसेच नाहीत हे सिद्ध झाले आहे. तुमच्यावर थकबाकी आहे म्हणून आम्ही कोळसा पुरवणं थांबवलेलं नाही. उन्हाळ्यासाठीचा कोळसा हे साठवू शकले नाहीत, कारण ३ पक्षांच्या सरकारमध्ये समन्वय नाही. अन्य राज्यांत वीज संच बंद पडले नाहीत, यांच्याकडे पडताहेत. प्रवासी गाड्या रद्द करून कोळशाच्या रॅकसाठी मार्ग मोकळा करून देत आहोत. यांच्या चुकीमुळे सर्व प्रवासी गाड्या रद्द करू शकत नाही.'
- रावसाहेब दानवे, केंद्रीय कोळसा राज्यमंत्री

बातम्या आणखी आहेत...