आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात संमिश्र हवामान:राज्यात कुठे कडक ऊन, कुठे गारपीट, विदर्भात 44 अंश, पुण्यात पारा 40 अंशावर, सांगलीत गारा

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून अकोला जिल्ह्यात बुधवारी कमाल तापमान ४४, तर अमरावतीमध्ये ४३.२ अंशावर होते. विशेष म्हणजे या हंगामात बुधवारी पुणे शहरातील कमाल तापमानदेखील चाळिशीपार गेले आहे. दरम्यान, सांगली आणि गडहिंग्लजमध्ये प्रचंड गारपीट झाली, तर नाशिक जिल्ह्यात हलका पाऊस झाला. दुपारनंतर बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण झाल्याने उकाड्यात वाढ झाली.

राज्यामध्ये उन्हाची तीव्रता कायम असल्याने कोकण विभाग वगळता अन्य ठिकाणच्या जिल्ह्यांमध्ये तापमान हे चाळिशीपार, तर काही ठिकाणी चाळिशीदरम्यान होते. विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकणासह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे बुधवारी सांगली, गडहिंग्लज या ठिकाणी गारपीट झाली, तर नाशिक जिल्ह्यात ठरावीक भागामध्ये अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, राज्यामध्ये उकाडा प्रचंड वाढला असून एप्रिल महिन्यातही उन्हाची तीव्रता अशीच कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

प्रमुख शहरांचे कमाल तापमान
अकोला ४४.०
अमरावती ४३.२
चंद्रपूर ४२.६
अहमदनगर ४२.४
वर्धा ४२.२
परभणी ४२.२
मालेगाव ४१.६
वाशीम ४१.५
गोंदिया ४१.५
नागपूर ४०.९
औरंगाबाद ४०.८
सोलापूर ४०.६
पुणे ४०.१
सातारा ३९.५

पाऊस, गारपिटीचा अंदाज
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ठिकठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. तसेच या काळात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर आणि नंदुरबार जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत हलका पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...