आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये एमआरटीपी अ‍ॅक्टअंतर्गत पहिला गुन्हा:अनधिकृतपणे नैसर्गिक नाले बुझवणारे 2 बिल्डर तुरुंगात जाणार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नैसर्गिक नाले बुझवून त्यावर गगनचुंबी इमारतींचे इमले बांधणाऱ्या विकसकांना दणका देत नाशिक महापालिकेने एमआरटीपी अर्थातच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चा वापर करून पहिला गुन्हा म्हसरूळ शिवारातील सर्व्ह क्रमांक ७१ मधील वरवंडी भागात दाखल केला आहे. ५० वर्षापुर्वी अशाचपद्धतीने नैसर्गिक नाले बंदिस्त केल्यामुळे मुंबईत २००६च्या सुमारास उद्वभलेल्या पुर परिस्थितीचा अभ्यास असल्यामुळे हे प्रकरण पवार यांनी गांर्भीयाने हाताळले. दरम्यान, या प्रकरणात आडगाव पोलीस ठाण्यामध्ये दोन बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

नाशिक शहरात गेल्या काही वर्षात मोठ मोठी बांधकामे करताना नैसर्गिक नाल्यांचे पात्र बुझवले गेले. किंबहुना काही ठिकाणी नाल्यालगत बांधकामे करताना भराव टाकल्यामुळे पात्र संकुचित झाले. काळाच्या ओघात काही नाले तर अक्षरश: गायब झाले. हे सर्व नाले पावसाळ्यात पुन्हा मोकळे होवून थेट घरात पाणी जाण्याचे प्रकार होत आहे. विकसक बांधकाम करून मोकळा होत असून भविष्यात त्याचा फटका रहिवाशांना बसत आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेत वॉर्ड ऑफिसर ते सहआयुक्त असा काम करण्याचा अनुभव असल्यामुळे आयुक्त पवार यांनी शहरातील नैसर्गिक नाल्यांचा आढावा घेतला. त्यात परस्पर नैसर्गिक नाले-सिमेंटचे पाईप टाकून बंदिस्त करण्याचा प्रकार समोर आल्यास एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र नगररचना विभागात वर्षानुवर्ष काम करणारे अधिकारी त्यासाठी धजावत नव्हते. अशातच म्हसरूळ शिवारातील प्रकरण समोर आल्यावर आयुक्त पवार यांनी तात्काळ आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार शाखा अभियंता पंकज बाप्ते यांनी फिर्याद दिल्यानंतर मिळकताधारक असलेले तिवारी व अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण किंबहुना अशापद्धतीने नैसर्गिक नाले बंदिस्त करण्याचे प्रकार वाढले आहे. वास्तविक अशा बेकायदेशीर कामाविरोधात कठोर कारवाईची तरतुद असून त्याचा वापर होत नव्हता. ही बाब लक्षात घेत पवार यांनी असे प्रकार आढळल्यास प्रथम पोलिस ठाण्यात फिर्याद, त्यानंतर लगेचच पालिका व पोलीसांमार्फत संयुक्त पंचनामा, संबधितास अटक व पुढे न्यायालयीन कारवाईसाठी पाठवण्याचा पायंडाच पाडला आहे. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांना लगाम लागणार आहे. अशा प्रकरणात एक वर्ष किंवा पाच वर्ष शिक्षेची तरतुद आहे.

पुराबाबत नाशिकची मुंबई व्हायला नको

पन्नास वर्षापुर्वी मुंबईत अशाचपद्धतीने नैसर्गिक नाले बंदिस्त केल्यामुळे आज पुरपरिस्थीतीचा सामना करावा लागतो. सुदैवाने नाशिकमध्ये अद्याप अनेक नैसर्गिक नाले कार्यरत आहेत. मात्र ते बुझवले गेले तर पुर परिस्थितीबाबत नाशिकची मुंबई व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात थेट तुरूंगात पाठवण्याची तरतुद आहे.
- रमेश पवार, पालिका आयुक्त

बातम्या आणखी आहेत...