आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्यावर कोणत्या धर्माचा शिक्का मारणारे हे कोण?:आंतरधर्मीय विवाह बीलसंदर्भात लेखिका रसिका आगाशे-आयुब यांनी सुनावले खडेबोल

पीयूष नाशिककर| श्री संत गाडगेबाबा साहित्य नगरी वर्धा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्ही सावित्रीच्या लेकी आहाेत, काेणाच्या हातातील बाहुल्या आहाेत का? आपल्या स्वत:च्या धर्मात लग्न करुन किती बायका खऱ्या अर्थाने सुखी आहेत. धर्म आणि स्त्रीया असा संंबंध लावून हे लाेक भांडवल करत आहेत. बाई तुझा धर्म काेणता हे विचारलं जातं. एकदाचं ठरवून तरी टाका बाईचा धर्म. आपल्याकडे एका परधर्मीय माणूस बाईचा फक्त उपभाेगच घेणार असं या लाेकांना का वाटतं? आमच्यावर काेणा एका धर्माचा ठपका मारला जाताे. बायांनाे... आपल्यावर काेणा धर्माचा शिक्का मारणारे हे काेण? असा खडा सवाल अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शक रसिका आगाशे -आयुब यांनी केला.

वर्ध्यातील 96व्या साहित्य संमेलनाला विराेध म्हणून विद्राेही सांस्कृतिक चळवळ आयाेजित 17व्या विद्राेही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन अभिनेत्री रसिका यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या की, मी आगाशे असून मुसलमान मुलाशी लग्न केलं. मात्र 2014पर्यंत मला काेणीही त्याबद्दल विचारलं नाही. आता मात्र जाे उठेल ताे विचारताे, साेशल मीडियावर कमेंट येतात की मग काय लव्ह जिहाद का? घर वापेसी का? खरंतर स्पेशल मॅरेज अॅक्टबद्दल काेणाला काहीच माहिती नाही. मी भारतीय व्यवस्थेबद्दल बाेलते तर माझ्याकडे बाेट दाखवलं जातं. मग काय मी पाकिस्तानबद्दल बाेलू का? आज हे लाेक आंतरधर्मीय विवाहाच्या संदर्भातील बील पास करायला निघाले आहेत. उद्या हे धाडस आंतरजातीयपर्यंत येइल. तेव्हा आपण आतापासूनच बाेललाे पाहिजे. नाहीतर यांचे हे निर्णय आपल्यावर लादले जातील. आमच्या आमच्यावर काेण्या एका धर्माचा शिक्का मारणारे हे लाेक काेण? आमच्या शरिरात मन नावाचाही अवयव आहे. हे आता या व्यवस्थेला, यंत्रणेला ठणकावून सांगायचे आहे. खरंतर मी आजून पूर्ण आगाशेही झालेली नाही तर अय्युब वरुन अनेक प्रश्न विचारले जातात. माणूस म्हणून मला रसिकाच राहू द्या. आणि प्रत्येकिने असाच स्वत:चा शाेध घेत व्यवस्थेला खडे बाेल सुनावण्याची आता खरी वेळ आली असल्याचेही रसिका यांनी यावेळी मांडले.

हिंदु मुलींना हे प्राॅपर्टी समजतात

आम्ही हिंदू मुली मूर्ख आहाेत का? आणि जर आम्हाला तुम्ही मूर्ख ठरवत असाला तर मग मतदानाचा अधिकार का दिला? मुलींना प्राॅपर्टी समजतात, तसं वागवलं जातं हे वास्तव नाकारता येणार नाही. आमचा धर्म काेणता हे देखील यांनीच ठरवायच का? आधी बापाचा, नंतर नवऱ्याचा. म्हणजे मग हिंदू धर्मातील मुलींची संख्या कमी व्हायला नकाे, पर्यायाने आपली कम्युनिटी कमी व्हायला नकाे.

बातम्या आणखी आहेत...