आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकच्या विकासासाठीच आम्ही बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात गेलाे मात्र ज्यांच्या डोक्यात कायम खोकी घुसलेली आहे त्यांना कोण समजावणार? निष्ठावंत असतानाही विजय करंजकर यांच्यावर पक्षातील तथाकथित सिल्व्हर ओकशी संबंधित नेत्यांनी कसा अन्याय केला हा इतिहासही लक्षात घ्यावा, असा टोला अजय बोरस्ते यांनी लगावला.
शिंदे गटात गेल्यानंतर बोरस्ते यांच्यासह अकरा नगरसेवकांवर शिवसेना नेत्यांनी गंभीर आरोप केले. त्यास उत्तर देताना बोरस्ते म्हणाले की, नाशिकच्या विकासासाठी आम्ही पक्षप्रवेश केला. एकमेकांचे पाय खेचण्याच्या राजकारणात न पडता आम्ही समृद्ध नाशिकसाठी नवा झेंडा हाती घेतला आहे. मात्र, ज्यांच्या डोक्यात कायम ‘खोकेच’ भरले आहेत आणि ज्यांनी आपल्या स्वार्थासाठी युती तोडून आघाडी केली, वर्षानुवर्षे यांच्याशी संघर्ष केला, त्यांच्याच गळाभेटी घेणाऱ्यांना बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीची आठवण कशी राहील. माझ्यासह सर्व नगरसेवकांनी पक्षाला रसातळाला नेणाऱ्या, गटबाजी करून खुद्द बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार नाही अशा पद्धतीने विघातक कार्य करणाऱ्या प्रवृत्तींबाबत सर्वांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आमचा नाइलाज झाला. यापुढे विरोधकांच्या आरोपांना आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तरे देऊ. भविष्यात आणखी काही हात आमच्याबरोबर जोडले जाणार असल्याचे सूताेवाचतही त्यांनी केले.
बोरस्ते म्हणाले की, १० वर्षांत मला पक्षाने भरभरून दिले आणि त्यानंतरही मी गद्दारी केली अशी टीका करण्यात आली. पक्षाने गुणवत्ता बघितली हाेती. ती माझ्यामध्ये हाेती म्हणून मला पदे मिळू शकली. याची जाणीव कदाचित माझ्यावर आरोप करणाऱ्यांना नसेल. अयोध्येतील शरयू नदीच्या तीरावरील महाआरती असेल, उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे शेतकरी अधिवेशन अशा नानाविध जबाबदाऱ्या पार पाडल्यामुळे खुद्द उद्धव साहेबांनी माझी पाठ थोपटली होती, असेही ते म्हणाले.
करंजकरांमागचा बोलवता धनी कोण? हेदेखील कळावे
सध्या पक्ष बदलणाऱ्यांवर २५, ५० ओके असे आरोप करण्याची नवीनच फॅशन आली आहे. ज्यांना कायमच बाजारामध्ये विकण्याची सवय झाली आहे, त्यांच्याकडून असे आरोप होणे स्वाभाविक आहे. करंजकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण बोलत होते. त्यांना पत्रकार परिषदेत शेजारून मार्गदर्शन करणारा बोलवता धनी कोण याचाही खुलासा केला तर बरे होईल, असा चिमटा बोरस्ते यांनी घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.