आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:पत्नीची आत्महत्या; पतीचा पोलिस ठाण्यातच गळफास, सासरकडून मारहाण होण्याची भीती

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कौटुंबिक वादातून घडली घटना, ठाण्यात तणाव

कौटुंबिक वादातून सकाळी पत्नीने केलेल्या आत्महत्येनंतर सासरच्या लोकांकडून मारहाण होईल या भीतीने स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झालेल्या पतीने पोलिसांची नजर चुकवून रात्री पोलिस ठाण्यातीलच एका खोलीत गळफास घेतला. जायखेडा पोलिस ठाण्यात हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. ८) रात्री उघडकीस आला. प्रकाश भीमराव निकम असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नातेवाइकांची समजूत काढत मृतदेह धुळे येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

सटाणा तालुक्यातील नामपूर येथील प्रकाश निकम याची पत्नी छाया (राजनंदिनी) हिने शुक्रवारी (दि. ९) सकाळी घरी आत्महत्या केली. त्यानंतर विवाहितेच्या माहेरच्यांनी प्रकाशने व त्याच्या घरच्यांनी तिला शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास देऊन तिचा घातपात केल्याचा आरोप करत पोलिस कारवाईची मागणी केली होती. जायखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रकाशने सुरक्षेची मागणी केल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी त्याला ताब्यात घेत पोलिस कोठडीत न ठेवता पोलिस ठाण्यातीलच दुसऱ्या खोलीत चौकशीसाठी बसवून ठेवले होते. त्यानंतर प्रकाशने रात्री पोलिसांची नजर चुकवून टेबलवर खुर्ची ठेवत कपड्याच्या साहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पत्नीने आत्महत्या केल्याची भीती आणि पुढे होणारी पोलिस कारवाई यातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे.

सीसीटीव्ही घटना चित्रीत
हा सर्व प्रकार पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. दरम्यान, शनिवारी (दि.१०) पाच वाजता नामपूर येथे प्रकाश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे. दरम्यान, या प्रकरणाची पोलिस सखोल चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले.

समिती स्थापन, अहवालानंतर पोलिसांवर कारवाई
पोलिस कोठडीत मृत्यू झाला नाही. पत्नीच्या मृत्यूनंतर पती स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला. घटनेच्या चौकशीसाठी सटाणा पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांची समिती नेमली आहे. ही समिती रात्री अहवाल देणार आहे. यानंतर संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. सचिन पाटील, अधीक्षक, ग्रामीण पोलिस दल

बातम्या आणखी आहेत...