आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा“ओळ गझलेची नवी सुचवायला ये, पुन्हा तू एकदा दुखवायला वेळ तर देशील की नाहीस तू, वेळ तर लागेल ना विसरायला?” या अनिता बोडके यांनी लिहिलेल्या आणि इतर गझलकारांच्या गझलांनी गझलोत्सवात रंग भरले. वैशाख पाडव्याच्या औचित्याने कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात काय कार्यक्रम रंगला. विश्वास ठाकूर हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.
संजय गोरडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर आकाश कंकाळ व जयश्री वाघ यांनी सूत्रसंचालन केले. नासिर शकेब यांनी त्यांच्या उर्दू गझलांचे दिलखुलास सादरीकरण करून श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळवली “पाठ माझी वेदनांचे बोचके सांभाळते अन् तिला सांभाळणारी शांत गोगलगाय मी” अशा शब्दात सांगलीच्या निर्मिती कोलते आपल्या जगण्यातली वेदना शब्दबद्ध केली.
“बोलून पाहू शब्द तहाचे किती दुःख हे रणांगणावर चल ताऱ्यांचे तोरण बांधू पुन्हा मनाच्या नभांगणावर” जयश्री वाघ यांच्या या ओळींनी संध्याकाळ मंत्रमुग्ध केली. “सप्तकातच हिंडणाऱ्यांची घराणी सोडली मी गळ्यातच अर्धवट कित्येक गाणी सोडली ही व्यथा अकोल्याचे गोपाल मापारी यांनी गझलेतून मांडली तर “माझ्यातलं गाव मला शहरात जाऊ देत नाही...” ही काळीज पिळवटून टाकणारी कविता मुक्काम चे संजय शिंदे यांनी सादर केली.
“इथे..थडग्यात माझ्या टोचते आहे मला काही बघा उकरून मित्रांनो कुणाची हाय आहे का?” असे रोमांचित करणारे शेर प्रसिद्ध कवी संतोष वाटपाडे यांनी सादर केले. ज्येष्ठ कवी अरूण सोनवणे यांनी आपल्या पहाडी आवाजात त्यांच्या सुंदर रचना सादर केल्या तसेच याप्रसंगी संजय गोरडे, श्रीकांत चवरे, प्रमोद राठोड, राजेश्वर शेळके, हिरालाल बागूल, रुपाली कोराळे, गोकुळ वाडेकर, विनय पाटील यांनी परिश्रम घेतले.
पुण्यामुंबईचे रसिक चाहते यावेळी त्यांच्या आवडत्या कवी-गझलकाराला ऐकण्यासाठी आले होते. पुण्याहून आकाश सावंत तर मुंबईचे सदानंद बेंद्रे, स्वरूपा सामंत, येवल्याचे कवी सचिन साताळकर तसेच घोटीहून योगेश उगले यांच्यासह शहरातील अनेक नामवंत कवी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.