आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:नाशकात आता जांभळांपासून वाइनचे उत्पादन!

नाशिक ( संजय भड )10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पश्चिम घाटातील जांभळांवर विंचूरमध्ये प्रक्रिया; अडीच लाख बियाण्यांचे राेपणही

देशाची वाइन कॅपिटल म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये आता जांभळांपासूनही वाइन उत्पादन सुरू झाले आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पक्व झालेल्या जांभळांचे संकलन करून त्यावर विंचूर वाइन पार्क येथे प्रक्रिया करून हे वाइनचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. नाशिकच्या ईएसडीएस साॅफ्टवेअरचे सीएमडी तथा चेअरमन पीयूष साेमाणी यांनी हा आगळाप्रयाेग केला आहे. “रेसवेरा वाइन्स’च्या माध्यमातून जांभळांच्या वाइनचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले असून ही आरोग्यदायी वाइन बाजारात दाखल झाली आहे. विशेष म्हणजे, द्राक्षाच्या तुलनेत जांभळांपासून वाइन निर्मितीसाठी शंभरपट अधिक संधी आहे.

सह्याद्रीच्या जंगलातून जांभळांची सर्वांत सुगंधी, स्वादिष्ट व पौष्टिक वाइन बनवण्याची साेमणी यांची इच्छा हाेती. २०१३ मध्ये त्यांना रेसवेराला जगातील अव्वल वाइन मेकर्स असलेले कॅनडामधील जय आणि डोमिनिक सापडले. २०१८ मध्ये उत्पादन साकारण्याच्या प्रक्रियेस वेग मिळाला. या वाइन निर्मात्यांनी २०१८ आणि २०१९ मध्ये जांभळाद्वारे मद्य तयार केले. चाचणीत ते सर्व निकषांवर उतरले. त्याचे नाव “रेसवेरा’ असे निश्चित करण्यात आले.

वाइन निर्मितीसाठी जांभूळ सह्याद्रीच्या जंगलातून संकलित केले जात आहेत. पश्चिम घाटातील शेकडो बचत गटांचा यात सहभाग असून आदिवासींकडून अत्यंत काळजीपूर्वक आणि स्वच्छतेने जांभूळ संग्रहित केले जातात. यातून आदिवासींसाठी उन्हाळ्यात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. यापूर्वी ९०% जांभळे झाडाखाली पडून नष्ट हाेत. त्यानेच तेथील लाेकांना आज रेसवेरामुळे उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध करून दिला आहे. वायनरीमधील बलून-प्रेस प्रक्रियेदरम्यान हजारो किलो बियाणे जांभळाच्या लगद्यापासून वेगळे केले जातात. एका वाइनच्या बाॅटलसाठी किमान २५० जांभळांचा ज्यूस वापरला जाताे. या प्रक्रियेतून निघणाऱ्या सर्व बियांची लागवड केली जाऊ शकते हे हेरून सर्व बियाणे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना देशभर नि:शुल्क उपलब्ध करून दिली जात आहेत. आता मलबेरी, फणस, अननसापासूनही लवकरच वाइन तयार करण्यात येणार आहे.

जांभळांपासून वाइनची १०० पट संधी

जांभळाचे फळ अतिशय नाजूक असते. पक्व झाल्यानंतर ते लवकरात लवकर क्रश करावे लागते. वर्षातील केवळ चाळीस दिवसच हे फळ उपलब्ध हाेते. द्राक्षापासून वाइनचा विचार करता जांभूळ वाइननिर्मितीच्या संधी शंभर पट अधिक आहेत. - पीयूष सोमाणी, मार्गदर्शक रेसवेरा वाइन

बातम्या आणखी आहेत...