आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडी:उत्तरेकडून ताशी 5 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात गारठा; आज मराठवाड्यात, आगामी दोन दिवस विदर्भात पाऊस

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गुरुवारी (१३ जानेवारी) किमान तापमानात थोडी वाढ झाली असली तरी उत्तर भारतातील थंडीची लाट व तिकडून ताशी चार ते पाच किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रात तुलनेने थंडी अधिक आहे. ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात अंशत: वाढ झाली आहे. गत आठवड्यापासून राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून विदर्भात गारपिटीसह पाऊस, तर मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. उत्तर महाराष्ट्रात अंशत: ढगाळ वातावरण व वाऱ्यांमुळे दिवसभर गारवा जाणवत आहे. थंडीचा गहू, हरभरा पिकांसाठी लाभ होत असला तरी ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष, कांदा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्याचे कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ यांनी सांगितले.{ उर्वरित पान. ५

आज मराठवाड्यात, आगामी दोन दिवस विदर्भात पाऊस
उत्तर कर्नाटक ते ओरिसा दरम्यान १ किलोमीटरवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या परिसरातून अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे शुक्रवारी मराठवाड्यात तर आगामी दोन दिवसांत विदर्भात मध्यम पाऊस राहणार आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.

थंडीचा कडाका वाढणार : उत्तर वायव्य भारतात १६ आणि १८ जानेवारीला पश्चिमी चक्रावात येणार आहे. उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढणार असून तिकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे गुजरात, मध्य प्रदेशासह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवणार आहे.

थंडीमुळे खान्देशात प्राैढाचा मृत्यू
फैजपूर | बसस्थानकात अनाेळखी प्राैढाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला. थंडीत गारठल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या शक्यतेला दुजाेरा मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. अद्याप मृताची ओळख पटलेली नाही. दाेन दिवसांपूर्वी ताे शहरात आला आणि सर्वप्रथम सुभाष चाैकात दिसून आला हाेता. मृताची ओळख पटवण्याचे आवाहन सहायक पाेलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी केले आहे.

प्रमुख शहरांतील किमान तपमान
औरंगाबाद १२.५, नाशिक- ११.६
जळगाव १२.०, पुणे -१२.१
नागपूर १४.०, अहमदनगर - १३.४
महाबळेश्वर ११.४, परभणी - १४.४
सोलापूर १६.२, नांदेड- १६.४

बातम्या आणखी आहेत...