आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:कितीही गाळले तरी पाण्याचा रंग मातकटच, हंडाभर गढूळ पाण्यासाठी 35 फूट विहिरीत महिलांची जीवघेणी कसरत

त्र्यंबकेश्वर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाड्याचं नाव महादरवाजा, पण पाण्यासाठी गावातल्या महिलांच्या वाट्याला मात्र मरणकळा. दोन किलोमीटरची पायपीट आणि केवळ दगडांच्या कपारींचा निसटता आधार घेऊन पस्तीस फूट खोल विहिरीत उतरण्याची ही जीवघेणी कसरत केल्यावर सोनाबाईंच्या वाट्याला येते अवघे हंडाभर पाणी.. तेही चिखलाने गढुळलेले आणि मातीने मचुळलेले. विहिरीत उतरताना ना दोरीचा आधार ना पायऱ्यांची साथ. पाझरांमुळे निसरड्या झालेल्या कातळावरून पाय निसटला तर थेट कपाळमोक्षच.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी नळ पाणी योजनेचे उद्घाटन केलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हा पाडा. मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारा महादरवाजा मेट. पाचशे लोकवस्तीच्या गावासाठी ना रस्ता आहे ना पाण्यासाठी सोय. पाण्यासाठी यांची भिस्त अडीच किलोमीटरवरच्या या विहिरीवर. त्यात विहिरीचे पाणीही तळाला गेलेले. त्यामुळे रात्रभर विहिरीच्या कडेला थांबून वाट पाहायची आणि पाणी जमल्यावर अशा प्रकारे कसरत करीत एकीने विहिरीत उतरावे, अशी जीवघेणी कसरत येथील महिलांना करावी लागत आहे. विहिरीतील पाण्याची पातळी एवढी खोल गेली आहे की एखादीला खाली उतरूनच सगळ्यांची डबडी भरून द्यावी लागतात, तेव्हा हंडाभर पाणी शेंदणे शक्य होते. एवढी कसरत केल्यावर वाट्याला येते तेदेखील चिखल भरलेले मचूळ पाणी. कितीही गाळले तरी त्याचा मातकट रंग सरत नाही. पुन्हा अडीच किलोमीटर पायपीट करून हे पाणी घरी न्यायचं आणि चिखल खाली बसला की ते वापरासाठी घ्यायचं, असा आरोग्यालाही धोकादायक खेळ गावकऱ्यांना करावा लागतो आहे.

ना लोकप्रतिनिधींचे लक्ष ना प्रशासनाची दखल
हंडाभर पाण्यासाठी रात्रंदिवस जागणारे महादरवाजा मेटचे आदिवासी संतापले आहेत ते त्यांच्या या प्रश्नाबद्दल लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दिलेल्या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे. पाचशे लोकवस्तीच्या या पाड्यावर ३२५ मतदार आहेत. पण, रस्त्याचा व पाण्याचा प्रश्न सोडवावा म्हणून त्यांनी केलेल्या अर्ज-विनंत्यांना सर्वांनीच केराची टोपली दाखवल्याची त्यांची व्यथा आहे. येथील ७२ कुटुंबांतील पन्नासहून अधिक महिलांना पाण्यासाठी अशी जीवघेणी कसरत करावी लागते आहे.

सर्वांकडे दाद, केवळ आश्वासने
त्र्यंबक तालुक्याच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर आमचं गाव आहे, पण गावाला रस्ता नाही की पाणी नाही. अडलेल्या बाईला डोली करून न्यावं लागतं. पाण्यासाठी तर महिलांना रात्रंदिवस अशी कसरत करावी लागते. आतापर्यंत आम्ही आमदारांना, खासदारांना, ग्रामसेवकांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांकडे याबद्दल दाद मागितली. पण आज करतो, उद्या करतो यापेक्षा वेगळं उत्तर नाही. संपत चहाळे, ग्रामस्थ

बातम्या आणखी आहेत...