आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काव्य संमेलन:शहरातील खड्ड्यांना जबाबदार अधिकाऱ्यांवर शब्दांचे ताशेरे ; कम्युनिस्ट पक्षातर्फे आंदाेलन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन वर्षांत तयार झालेले जवळपास सहाशे कोटीचे नवे रस्ते पावसामुळे खड्ड्यात गेल्याचे बघून निकृष्ट कामकाजावर ताशेरे ओढण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासमोर स्वाक्षरी मोहीम, छायाचित्र प्रदर्शन आणि कवि संमेलनचे भरवले. यातून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी रस्ते कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.

भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. राजू देसले, राज्य कार्यकारिणी सदस्य महादेव खुडे, जिल्हा सचिव दत्तू तुपे, शहर सचिव तल्हा शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात अाले. ‌रस्त्यांच्या दुर्दशेला जबाबदार असणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या शहर अभियंता व बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा व त्यांच्या आर्थिक स्रोतांची चौकशी करण्यात यावी. या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

यापुढील काळात रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदारांचे नाव, मोबाइल क्रमांक, खर्चाचा तपशील, शिफारस करणाऱ्या नगरसेवकांचे नाव, अधिकाऱ्यांचे नाव यासंदर्भातील फलक प्रत्येक रस्त्याच्या ठिकाणी लावावा. दर सहा महिन्यांनी रस्त्यांच्या कामांचे आॅडीट मतदारांसमोर ठेवावे. प्रभागांमध्ये क्षेत्रसभा घेऊनच रस्त्यांचे बजेट मंजूर करण्यात यावे. रस्त्यांची पायाभूत सुविधा महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत महापालिका आयुक्तांच्या अधिकारक्षेत्रात‌ येत असल्याने तत्कालिन संबंधित आयुक्तांचीही याप्रकरणी चौकशी करून त्यांना जबाबदार धरण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या. ज्येष्ठ साहित्यिक व कवी डॉ. शंकर बोऱ्हाडे, रविकांत शार्दुल, कविता बिरारी, अरुण घोडेराव, चेतन पणेर, पुष्पलता गांगुर्डे, सीमाराणी बागुल यांनी कविता सादरकरीत खड्ड्यांना जबाबदार अधिकाऱ्यांचा जोरदार समाचार घेतला.

बातम्या आणखी आहेत...