आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाला यश:कामाहून कमी केलेल्या कामगारांनी कुटुंबियांसह केले कंपनीच्या प्रवेशव्दारावर आंदाेलन, 55 कामगारांना घेतले पुन्हा कामावर

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर औद्योगिक वसाहतीतील सुप्रीम ऑटो सेल इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीतील कामावरून कमी केलेले कामगारांसह हिमाचल प्रदेशात बदली केलेल्या 55 कामगारांनी साेमवारी (दि.६) आपल्या कुटुंबियांसह सकाळपासून कंपनीच्या प्रवेशव्दारासमोर आंदाेलन केले. मात्र शहर पाेलिस आयुक्तालयात जमाव बंदी आदेश लागू करण्यात आलेले असल्याने सातपूर पोलिसांनी कामगारांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अटक करून पाेलिस ठाण्यात आणले.

पाेलिस ठाण्यातच कामगार, सीटू युनियन प्रतिनिधी व कंपनी व्यवस्थापन यांच्यात पाेलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी यशस्वी चर्चा घडवून आणल्याने आंदाेलनकर्त्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. या निर्णयामुळे कामगार कुटुंबियांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

सुप्रीम ऑटाे सेल कारखान्यातील कामगारांना करारानुसार 9 महिन्यांपासून वेतनवाढ रखडलेली हाेती. करारानुसार कामगारांना लाभ मिळावेत अशी मागणी युनियनच्या वतीने करण्यात येत हाेती. मात्र व्यवस्थापनाने कंपनीतील 15 कामगारांची हिमाचल प्रदेशातील शाखेत बदली करत 55 कामगारांना कामावरून कमी केले हाेते. यावरून कामगारांमध्ये संताप व्यक्त हाेत हाेता. अनेकवेळा व्यवस्थापनाशी चर्चा करुनही ताेडगा निघत नसल्याने साेमवारी सकाळपासूनच कामगारांनी कुटुंबियांसह कंपनीच्या प्रवेशव्दारासमाेर आंदाेलन सुरु केले.

यावेळी काेणालाही कंपनीच्या आत अथवा बाहेर जाऊ दिले जात नसल्याने गाेंधळाची स्थिती निर्माण झाल्याने पाेलिसांनी कारखान्याकडे धाव घेत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंदाेलन करणाऱ्या कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांना ताब्यात घेऊन त्यांना पाेलिस ठाण्यात घेऊन गेले. तेथे कामगारांनी गाऱ्हाणे मांडल्याने पाेलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी कामगारांसह सीटू युनियनचे प्रतिनिधी व व्यवस्थानाचे प्रतिनिधी यांच्याशी समाेरासमाेर चर्चा करून समेट घडवून आणला. त्यामुळे व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्या मान्य करतानाच त्यांना मंगळवारपासून (दि.7) कामावर घेण्याचे मान्य केले. व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. चर्चेप्रसंगी सिंधु शार्दुल, कल्पना शिंदे, आण्णा त्रिभुवन, मोहन पाटील, महेंद्र ढोमसे, भाऊसाहेब पाटील, झाल्टे, संदीप सोमासे आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...