आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआत्मनिर्भर, सक्षम विद्यार्थी-युवक घडवण्यासह शिक्षणासोबतच जागतिक दर्जाचे कौशल्य अन् त्यातून त्यांना रोजगार देणे या प्रमुख उद्देशाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना झाली आहे. विद्यापीठातील अभ्यासक्रम, स्वरूप आणि त्याची उपयुक्तता याबाबत कुलगुरू डाॅ. अपूर्वा पालकर यांनी ‘दिव्य मराठी’शी सविस्तर चर्चा केली...
प्रश्न : काैशल्य विकासचे उपक्रम सध्या राज्यभर राबवले जात असताना विद्यापीठ स्थापनेचा उद्देश काय? त्यात वेगळेपण असेल का? उत्तर : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठातून उत्तीर्ण विद्यार्थ्याला रोजगार मिळावा आणि उद्योजकही तयार व्हावेत या प्रमुख उद्देशाने विद्यापीठाची स्थापना झाली आहे. त्यामध्ये उद्योगांसोबत सांगड घालून त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कौशल्य विकसित मनुष्यबळनिर्मिती करून देणे. स्किल गॅप भरून काढण्यासाठी उद्योगांसोबत काम करणार आहोत.
प्रश्न : कुठल्या स्वरूपाचे अभ्यासक्रम असतील? यामध्ये जागतिक स्तरावरील कुठल्या अभ्यासक्रमांचा समावेश असेल? उत्तर : स्कूल ऑफ इंजिनिअरिंग सायन्स अॅँड टेक्नॉलॉजी, स्कूल ऑफ बिझनेस अँड कॉमर्स, स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन, स्कूल ऑफ ह्यूमॅनिटीज, स्कूल ऑफ इंटर डिसिप्लिनरी सायन्स अशा पाच प्रकारचा शाखा असतील. त्याअंतर्गत विविध अभ्यासक्रम असतील. इंजिनिअरिंग सायन्समध्ये हायएंड स्किल्स, अॅस्पिरेशनल स्किल्स अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. आपण मेक इन इंडियाअंतर्गत उत्पादन क्षेत्राला अधिक महत्त्व देणार आहोत.
प्रश्न : रोजगाराच्या संधींबाबत काय सांगाल? या विद्यार्थ्यांना जगभरात काही संधी मिळू शकतील का? उत्तर : आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध संस्थांसोबत चर्चा सुरू आहे. अॅनिमेशन आणि गेमिंगमध्ये खूप आघाडीवर असलेल्या फ्रान्समधील संस्थांसोबत बोलणे सुरू आहे. ऑनलाइन स्पेस, कॉमर्स आणि बिझनेसमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रियातील डेक्कन विद्यापीठ, न्यूझीलंड, यूके, युरोपमध्येही आपली सध्या चर्चा सुरू आहे. यातून ग्लोबल प्रमाणपत्र आपण देणार आहोत.
प्रश्न : संपूर्ण महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र असल्याने कामकाज कसे चालेल ? उत्तर : पनवेलला विद्यापीठ असेल. मुंबईत मुख्यालय आणि राज्यात विभागीय केंद्र असतील. नाशिकसह पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, मुंबई, कोल्हापूर येथे केंद्र असतील.
प्रश्न : प्रत्यक्ष अभ्यासक्रम केव्हापासून सुरू होतील? सध्या कुठले अभ्यासक्रम सुरू झाले आहेत ? उत्तर : काही अभ्यासक्रम आता सुरू केलेत. उर्वरित अभ्यासक्रम हे जून-जुलैमध्ये सुरू होतील. स्थलांतर कमी व्हावे यासाठी स्थानिक पातळीवरील गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रम विकसित केले जातील, पण ते जगभरात कुठेही उपयुक्त असतील. जसे नाशिकमध्ये कृषी-तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांचाही समावेश असेल. अॅनिमेशन अँड गेमिंगचे अभ्यासक्रम मुंबईत असतील. आयटी बेस अभ्यासक्रम पुण्यात असतील. त्यावर सध्या तज्ज्ञ काम करत असून फेब्रुवारीअखेरीस आपण यादी जाहीर करत कुठले अभ्यासक्रम कुठे असतील हेही स्पष्ट करू.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.