आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मजागर:समर्थ सेवेकऱ्यांकडून गोदामाईचे पूजन ; गंगादशहरा उत्सवानिमित्त राज्यभरातील भाविकांची उपस्थिती

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग व पुरोहित संघाच्या वतीने गत ५० पेक्षा अधिक वर्षांची परंपरा असलेला गंगापूजनाचा सोहळा मोठ्या मंगलमय वातावरणात गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांचे हस्ते रामकुंडावर पार पडला. शुक्रवारी (दि. ३) या सोहळ्याने उपस्थितांना सिंहस्थ कुंभमेळ्याचीच आठवण करून दिली. याप्रसंगी खा. हेमंत गोडसे, आ. सीमा हिरे, महापालिका आयुक्त रमेश पवार, वत्सला खैरे, महेश हिरे उपस्थित होते. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून दशमी असे १० दिवस भारतभर गंगादशहरा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी ३१ मे ते ९ जूनपर्यंत गंगादशहरा उत्सव साजरा हाेत आहे. यावेळी गुरुमाउली अण्णासाहेब मोरे म्हणाले की, भारतात नद्यांना आम्ही मातेचा सन्मान दिला आहे. नदी जीवसृष्टीला सजीवत्व देते. या गोदामातेशी आपले मानसिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक दृढभावबंध युगानुयुगे रुजले आहेत. म्हणूनच जीवसृष्टीला नवचैतन्य देणाऱ्या गंगा गोदावरी मातेचे पूजन करत सन्मान करत आहोत. दरवर्षीप्रमाणे गंगापूररोड येथील श्री स्वामी समर्थ केंद्रातून गंगाजल कलशाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गांवर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भगवे ध्वज घेत महिला पुरुष सेवेकरी रामकुंड परिसरात गंगापूजन सोहळ्यात सहभागी झाले. पुरोहित संघांचे सतीश शुक्ल आणि सहकाऱ्यांनी राष्ट्रकल्याण, राष्ट्ररक्षण, सर्व जीवसृष्टीच्या कल्याणाचे साकडे गुरुमाउली व उपस्थित सेवेकऱ्यांच्या वतीने गोदामाईस घातले. मंत्रघोषात गंगापूजन करण्यात आले. गोदामाईच्या माध्यमातून पर्जन्यराजाने कृपा करून जीवसृष्टीला नवचैतन्य द्यावे, शेतकरी सुखी व संपन्न व्हावा अशी मनोकामना गुरुमाउलींनी गोदामाईकडे व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...