आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय प्राचीन वाङ्मयात योग आणि ध्यानाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे प्राचीन वाड्मयात ऋषी, मुनी, योगी आणि संतांनी सांगितलेला योग आजच्या काळात जनसामान्यपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. तसेच समाजामध्ये व योग क्षेत्रात कार्य करणाऱ्या साधकांमध्ये नाडीशुध्दी या संकल्पनेबद्दल बरेच गैरसमज आढळतात. परंतु ही संकल्पना समजून घेण्याची गरज असून, त्याचे परिणामदेखील जाणून घ्यावेत, असे प्रतिपादन लोणावळा योग इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मन्मथ घरोटे यांनी व्यक्त केले.
पंचवटी येथील राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी आश्रम येथे योगा फाउंडेशन, महाराष्ट्र संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या वतीने दोन दिवसीय पहिल्या राज्यस्तरीय योगशिक्षक संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात 'परंपरागत योग विषयाचे आधुनिक काळात असलेले महत्त्व' या विषयावर डॉ. घरोटे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योग शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार उपस्थित होते. तसेच उपाध्यक्ष राहुल येवला, कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा धर्मगिरी योग महाविद्यालयाचे मार्गदर्शक डॉ. विशाल जाधव, महासचिव अमित मिश्रा, जीवराम गावले, गीता कुलकर्णी, डॉ. तस्मिना शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
दुपारच्या सत्रा नंदुरबार येथील योगशिक्षक शांताराम पाटील यांनी हस्तमुद्रांचे महत्त्व या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी अध्यक्षस्थानी सुभाष तायडे होते. प्रवीण मस्के यांनी सूर्यनमस्कार तर राजेश पाटील व वैशाली रामपूरकर यांनी योगासने प्रात्यक्षिके केली. मनीषा चौधरी यांनी प्राणायाम तर डॉ. वसुधा मोरे यांनी ध्यान व मुद्रा यांची प्रात्यक्षिके सादर केली. गोपालजी मुंदडा व समूहाने योगनृत्य सादर केले. सूत्रसंचालन डॉ. अजंली भालेराव, वैशाली रामपूरकर व दिपाली लामधाडे यांनी केले.
त्यानंतरच्या सत्रात डॉ. संजय अग्रवाल यांचे व्याख्यान झाले. त्यांनी ॲलोपॅथी अँड योगा द बेस्ट फ्रेंड या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी महासचिव वसंत काळेकर होते. सूत्रसंचालन दिपाली लामधाडे यांनी केले. त्यानंतरच्या सत्रात भालचंद्र नेरपगार शरद बजाज आणि विलासजी पलकोंडावार यांनी षटकार्म या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी लताबाई होलगरे होते. तर जालना येथील मनोज लोणकर यांनी ध्यान करण्याचे नाही तर ध्यान द्यायची प्राथमिक तयारी याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी भालचंद्र नेरपगार होते.
जळगावचे योगाचार्य कुणाल महाजन यांनी नादानुसंधान व ध्यान साधना यांच्यातील साम्य आणि भेद या विषयावर व्याख्यान दिले. अध्यक्षस्थानी संतोष खरटमोल होते. सातारा येथील योगशिक्षिका अनुराधा इंगळे यांनी योग विशिष्टमधील योग या विषयावर व्याख्यान दिले. अध्यक्षस्थानी डॉ. तस्मिना शेख होत्या. याप्रसंगी डॉ. जयदीप निकम उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अंजली भालेराव यांनी केले. वाशिम येथील वाशिमच्या पुष्पलता अफुने यांनी योगाचा खरा अर्थ आणि महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी अंजली देशपांडे होत्या.
एमपीएससी परीक्षेत योग विषयाला ऐच्छिक म्हणून मान्यता द्यावी तसेच शाळा व महाविद्यालयात योग विषयास मुख्य विषय म्हणून स्थान मिळावे, या मुख्य मागण्यांसह 12 ठरावांना पहिल्या राज्यस्तरीय योग संमेलनात मान्यता देण्यात आली. तसेच या सर्व मागण्या शासन दरबारी मंजूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. पंचवटी येथील राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी आश्रम येथे योगा फाउंडेशन, महाराष्ट्र संचलित योग शिक्षक संघाच्यावतीने पहिल्या राज्यस्तरीय संमेलनाचा समारोप करण्यात आला.
याप्रसंगी 12 ठरावांना एकमुखी मान्यता देण्यात आली. त्यामध्ये एमपीएससीसह प्रत्येक जिल्ह्यात आरोग्यवर्धिनीमार्फत योग सत्र आणि योगशिक्षकास नियमित करावे तथा मानध वाढवून द्यावे, शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये योग ब्रेक नियमित करावा, त्याकरिता एक तज्ज्ञ योगशिक्षक नेमावा, योग विषयाला सेट परीक्षेत सामील करावे, महाराष्ट्र पोलिस खात्यात योगशिक्षक नियमित करावा, जिल्हा सामान्य रुग्णालयात योग थेरफिस्ट जागा भराव्यात, ग्रामीण व शहरी भागातील वीस वर्षांपासून निशुल्क सेवा देणाऱ्या योग शिक्षकास लोक कलावंताप्रमाणे मानधन द्यावे, योग विषयाला पूर्णत: अनुदानित करावे, योग विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास फेलोशीप प्रदान करावी, मराठी साहित्य संमेलनाप्रमाणे दरवर्षी योग संमेलन शासनाच्या वतीने आयोजित करावे किंवा त्याकरिता संघटनेस अनुदान द्यावे, योगशास्त्रातील पदवीधर व उच्च शिक्षित योग शिक्षकांची नोंदणी करून त्यांना नोंदणी क्रमांक द्यावा आदी ठराव मांडण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले. तर दिपाली लामधाडे यांनी आभार मानले.
योग फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योग शिक्षक संघ आणि आदीयोग महाविद्यालय यांच्या सौजन्याने आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय योगासन स्पर्धेतील बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेसाठी राज्यभरातून एकूण 155 स्पर्धक नाव नोंदणी केली होती. प्रत्येक गटातून प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात आले. तसेच चतुर्थ व पाचवा क्रमांक यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आली. तसेच सर्व विजेत्या स्पर्धकांना योग पुस्तक देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.