आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाप’ प्रयोग:शेतकऱ्यांच्या पोरांना 'आयटी’त नोकरी, नाशिक जिल्ह्यातील पारेगाव खुर्द या खेडेगावात उभी राहतेय आयटी कंपनी

सिन्नर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील मुलांच्या अंगी टॅलेंट असूनही आयटी क्षेत्रात त्यांना मनाजोगी नोकरी मिळत नाही. आयटी कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळावी असे अनेकांचे स्वप्न असते. आयटीचे जाळे महानगरांमध्ये पसरलेले असल्याने ग्रामीण भागात राहणाऱ्यांना आयटी क्षेत्राचा प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र एका ध्येयवेड्या तरुणाने अहमदनगर जिल्ह्यातील पारेगाव खुर्द या १२०० लोकवस्तीच्या खेड्यात आयटी कंपनी उभारली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणारा हा ‘बाप’ प्रयोग महाराष्ट्रातील इतरांसाठी पथदर्शी ठरणारा आहे.

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द या गावातील ३७ वर्षीय रावसाहेब रामनाथ घुगे हा तरुण गावातच खडकाळ माळरानावर स्वतःची आयटी कंपनी उभारतोय. रावसाहेब हे सध्या यूएसमध्ये आयटी कंपनी चालवतात. त्यांनी पारेगाव खुर्द या आपल्या अवर्षणग्रस्त खेड्यात ‘बाप’ (बिझनेस ॲप्लिकेशन अँड प्लॅटफॉर्म्स) या नावाने आयटी कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. आयटीमध्ये खूप चांगल्या संधी असूनही गावाकडची मुले अनेक अडचणींमुळे या संधीपासून दूर राहतात, याची खंत नेहमी त्यांच्या मनात असायची. शेतकऱ्यांच्या शिकलेल्या मुलांसाठी काहीतरी करायचे या उद्देशाने त्यांनी या कंपनीचे बांधकाम हाती घेतले असून ते प्रगतिपथावर आहे. जूनमध्ये प्रत्यक्षात प्रकल्प सुरू होणार आहे. यूएसमध्ये स्वतःची आयटी कंपनी असूनही आपल्या गावासाठी आणि परिसरासाठी काहीतरी करण्याचा ध्यास घुगे यांनी घेतला आहे. या आयटी कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना गावात राहूनच जागतिक स्तरावर नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या आयटी कंपनीत बारावी पास होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य दिले जाणार आहे. इंटर्नशिपप्रमाणे त्यांना तीन वर्षे योग्य प्रशिक्षण देऊन त्यानंतर याच कंपनीत नोकरीदेखील दिली जाणार आहे. त्यामुळे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांचे आयटी कंपनीत काम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अकोले, संगमनेर, सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची ४५ मुले-मुली घुगे यांच्याशी जोडली गेली आहेत.

चार वर्षांत ६०० मुलांना नोकरी
ग्रामीण मुलांना नोकरीच्या संधी या कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. ४ वर्षांत ५०० ते ६०० मुलांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. - रावसाहेब घुगे, संचालक, द बाप कंपनी.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रात काम
घुगे यांची ‘द बाप’ आयटी क्षेत्रात काम करणारी कंपनी वेगवेगळे संगणकीय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काम करते. ई-कॉमर्स, बँकिंग, ह्यूमन रिसोर्स आदी तीन ते चार डोमेनमध्ये काम करण्यात ही कंपनी अग्रेसर आहे. विशेष म्हणजे यातील सर्व क्लायंट अमेरिकेतील आहेत.

बातम्या आणखी आहेत...