आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज देयक थकले:बारागावपिंप्री ७ गाव योजनेची वर्षात पाचव्यांदा तोडली वीज

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामस्थांना सोसाव्या लागताहेत टंचाईच्या झळ‌ा
बारागावपिंप्रीसह सात गावे पाणी योजनेचे वीज देयक थकल्याने पुरवठा ठप्प आहे. वर्षभरात तब्बल पाच वेळा वीज जोडणी तोडण्याची कारवाई महावितरणने केली असून वीज देयकाचा तिढा सुटत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. बारागावपिंप्री, पाटपिंप्री, सुळेवाडी, केपानगर, गुळवंच, निमगाव, हिवरगाव या गावांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यांना २०० लिटर पाणी ५० रुपयांना घ्यावे लागत आहे. योजना असल्याने या गावांना टँकर मंजूर होत नाही. तर योजनाही सुरळीत चालत नाही. अशी विचित्र स्थिती होऊन बसल्याने ग्रामस्थांना मात्र टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

योजनेची गळती थांबता थांबेना
योजनेला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गळती आहे. त्यामुळे गावांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. गळती दुरुस्तीसाठी खर्च करून ग्रामपंचायती मेटाकुटीला आल्या आहेत. सद्यस्थितीत खासगी टँकरचे ५० रुपये दराने २०० लिटर पाणी विकत घ्यावे लागते.

वर्षभरात ५ वेळा तोडली वीज
मार्च २० पासून योजनेचे देयक भरण्यासाठी टाळाटाळ करण्यात आल्याने महावितरणने वर्षभरात चार वेळा वीजपुरवठा खंडित केला. एकतर योजना सुरळीत चालत नाही. दुसरीकडे देयकाइतके वीजबिल जमा होत नाही. एक देयक भरले नाही तोच दुसरे हातात पडते.

कृषिपंपाप्रमाणे मुदत मिळावी
कृषिपंपांचा वीजपुरवठा तीन महिने खंडित न करण्याच्या सूचना ऊर्जा विभागाने दिल्या आहेत. पाणीटंचाई विचारात घेता पाणीपुरवठा योजनांकरिता ऊर्जा विभागाने असाच निर्णय घ्यावा. त्यामुळे टंचाईत पाणीपुरवठा करणे शक्य होईल. शिवाय पाणीपट्टी वसूल होऊन वीज देयक भरता येईल. - भाऊदास शिरसाठ, अध्यक्ष, बारागावपिंप्री पाणी योजना

आठ दिवसांत वीजपुरवठा खंडित
नांदूरमध्यमेश्वर धरणातील वीजपंपाचे सहा लाख रुपयांचे देयक गावांनी भरले होते. त्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यात आला. जेमतेम आठ दिवस योजना चालली. तोच केपानगरजवळील जलशुद्धीकरण केंद्राचे आणखी सहा लाख रुपये भरण्याच्या सूचना वीज महावितरणने केल्या. देयक न भरल्याने पुन्हा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...