आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआहेर वाड्यावरील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी छेडलेले उपोषण तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर स्थगित करण्यात आले.
नांदगाव शहराजवळ असणाऱ्या गंगाधरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेर वाडा वसाहत आहे. येथील नागरिकांना वाहिवाटीसाठी नाल्याच्या बाजूने पारंपरिक रस्ता आहे. पावसाळ्यात नाल्याला पाणी आल्यावर नागरिकांना जाण्या-येण्यासाठी रस्ताच राहात नसल्याने रस्ता बांधून देण्याची येथील नागरिकांची जुनी मागणी आहे. गंगाधरी ग्रामपंचायतीने रस्ता बांधून देण्यासाठी तीन लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला परंतु नाल्यालगतच्या शेतकऱ्यांनी या रस्त्यावर आक्षेप घेतल्याने रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नव्हती. पावसाळा तोंडावर आल्याने रस्त्याची समस्या पुन्हा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने एक मे रोजी येथील नागरिकांनी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपोषणाला प्रारंभ करत आम्हाला रस्ता मिळायलाच हवा, अशी जोरदार मागणी केली होती.
तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी रस्त्याच्या समस्येवर आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. चर्चेअंती नागरिकांची मागणी रास्त असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी गंगाधरी ग्रामपंचायतीचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित शेतकऱ्यांची तातडीची बैठक घेऊन मार्ग काढू असे सांगितल्यावर उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणात आम आदमी पक्षाचे विशाल वडघुले, अरुण दाभाडे. शिवाजी आहेर, संजय आहेर, बाळू आहेर, बळीराम आहेर, मनोज आहेर, सुनील सोनवणे, सूरज आहेर, स्वप्नील दाभाडे, महेंद्र आहेर, योगेश आहेर, अक्षय आहेर, संदीप आहेर, मच्छिंद्र आहेर, अंजनाबाई आहेर, इंदूबाई आहेर, मंदाबाई आहेर, विजया दाभाडे, रंजनाबाई आहेर यांनी सहभाग घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.