आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचे फड रंगणार:सिन्नर तालुक्यातील 38 गावांत सोसायटी निवडणुकीची रणधुमाळी; 13 ठिकाणी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घोषित केला आहे. त्यानुसार सिन्नर तालुक्यातील ३८ गावांमध्ये दि. १८, २० आणि २२ जून अशी तीन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या सर्व गावांमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीचे फड रंगणार आहे. पहिल्या टप्प्यात पांढुर्ली, उजनी, घोटेवाडी, दुसंगवाडी, देवपूर, कोनांबे, वडगाव-सिन्नर, कहांडळवाडी, पिंपरवाडी, आटकवडे, पाटपिंप्री, पिंपळे या गावांतील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीसोबतच सिन्नर तालुका बहुउद्देशीय सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

या १३ सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि.११ मे) पासून नामनिर्देशनपत्र भरण्यास प्रारंभ झाला आहे. १८ मेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. प्रत्येक दिवशी दाखल केलेल्या उमेदवारांची यादी निवडणुकीच्या कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे. १९ मे रोजी सकाळी ११ वाजता छाननी, २० मे रोजी वैधसूची प्रसिद्धी, २० मे ते ३ जून या कालावधीत माघारी तर ६ जून रोजी निशाणी वाटप करण्यात येणार आहे. गरज पडल्यास १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर लगेचच अर्ध्या तासाने मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात खंबाळे, लोणारवाडी, मऱ्हळ बुद्रुक, हिवरे, वडगाव पिंगळा, कासारवाडी, दातली, सुरेगाव, मोह, शहा, बारागावपिंप्री, केपानगर, आडवाडी या १३ गावांमध्ये विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक होत आहे. इच्छुक उमेदवारांना १३ मे ते २० मे या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. २३ मे रोजी छाननी, २४ मे रोजी वैधसूची प्रसिद्धी, २४ मे ते ७ जून या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना माघारीची वेळ देण्यात आली आहे. ८ जून रोजी निशाणी वाटप होऊन मतदान प्रक्रिया २० जून रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत पार पडणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने लगेचच जागेवर मतमोजणी होऊन निवडणुकीचे निकाल घोषित होतील.

बातम्या आणखी आहेत...