आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:धान्य वितरणातील अडचणी सोडवा,  अन्न पुरवठा मंत्र्यांना साकडे; सिन्नर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे मंत्री भुजबळांना निवेदन

सिन्नर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ई-पॉस मशीनला वारंवार नेटवर्कची समस्या निर्माण होत असल्याने धान्य वितरणात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. याशिवाय धान्य भरणा लवकर करूनही शासकीय गोदामातून धान्य साठा लवकर प्राप्त होत नाही. रेशन संदर्भातील अशा विविध तक्रारी सिन्नर तालुका रास्त भाव धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन धारक संघटनेच्या वतीने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे करण्यात आल्या. तक्रारींची दखल घेत भुजबळ यांनी तातडीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

संघटनेचे राज्याध्यक्ष डोळस पाटील, जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर तालुका संघटनेचे अध्यक्ष सतीश भुतडा, नवनाथ गडाख, भगवान जाधव, संजय झगडे, संजय भोत, दीपक जगताप, विवेक थोरात, योगेश बत्ताशे आदींच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री भुजबळ यांची भेट घेऊन संघटनेच्या विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. पुरवठा विभागाने ई-पॉस मशीनला धान्य साठा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, मोफत धान्य जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत विकत आणि मोफत असा दोन्ही धान्य साठा सोबत मिळाल्यास धान्य वितरण वितरणात सुसूत्रता येईल.

नवीन केसरी शिधापत्रिका ज्या आज रोजी अन्न सुरक्षा व प्राधान्य कुटुंब लाभार्थी या योजनेत नाहीत, अशा केशरी शिधापत्रिकांवर नवीन धान्य योजना अथवा कमी दरात धान्य उपलब्ध करून द्यावे, वंचित राहिलेल्या शिधापत्रिकाधारकांसाठी धान्याचा नव्याने साठा उपलब्ध करून द्यावा, वयोवृद्ध व्यक्तींचे बऱ्याचदा थंब‌ लवकर येत नाहीत. त्यामुळे धान्य वितरणात अडचणी निर्माण होतात.‌ अशावेळी त्यांच्या वारसांद्वारे धान्य वितरणाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. रास्त भाव दुकानदार यांच्या कमिशनमध्ये वाढ करून मिळावी, अशा स्वरूपाची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...