आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानादुरुस्त आणि जुनाट झालेल्या रुग्णवाहिकांमुळे अत्यवस्थ रुग्ण आणि गरोदर स्त्रियांना योग्य उपचारासाठी संदर्भित करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होत. ही अडचण लक्षात घेऊन ग्रामविकास मंत्रालयाच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नाशिक जिल्हा परिषदेमार्फत सिन्नरच्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक, सर्व सुविधांयुक्त रुग्णवाहिका पुरवण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकेतील सुविधांमुळे अत्यावश्यक स्थितीत गरोदर महिलेची प्रसूती व डॉक्टरांच्या उपस्थितीत अत्यवस्थ रुग्णावर उपचार करणे शक्य होणार आहे.
ग्रामविकास मंत्रालय मार्फत रुग्णवाहिका खरेदीसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी प्रयत्न केले होते. त्यास यश आल्याने जिल्ह्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी १५ लाख ५० रुपये किमतीच्या अत्याधुनिक रुग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेत आमदार कोकाटे, सिमंतिनी कोकाटे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, सरपंच प्रभाकर हारक, प्रा. राजाराम मुंगसे यांच्या उपस्थितीत सिन्नरच्या देवपूर, वावी आणि दापूर या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे या अत्याधुनिक रुग्णवाहिकांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. यापूर्वी सोमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रास एक रुग्णवाहिका देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांना २००४ साली टाटा सुमो कंपनीच्या रुग्णवाहिका पुरवण्यात आल्या होत्या.
मात्र, त्या जुनाट झाल्याने वारंवार नादुरुस्त होत होत्या. अत्यवस्थ रुग्णांना संदर्भित करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे रुग्णवाहिका सेवा असून नसल्यासारखी असल्याने सामान्यांच्या जनक्षोभाला आरोग्य विभागाला सामोरे जावे लागत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, लेखा व वित्त विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश बच्छाव, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, वाहन भांडार विभागाचे वरिष्ठ सहायक अंबादास पाटील यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी विशेष सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.