आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज:कराड पालिकेच्या शाळेत पहिलीच्या 400 जागांसाठी 1387 अर्ज

सातारा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळा व नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या प्राथमिक शाळांची दुरवस्था झालेली बघायला मिळते. शिक्षक नेमून दिलेल्या जागी शिकवायला जात नाहीत, अशाही बातम्या वाचायला मिळतात. अशा परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील कराड नगरपालिकेच्या शाळा नंबर ३ या शाळेत इयत्ता पहिलीच्या ४०० जागांसाठी १३८७ पालकांनी रांग लावून प्रवेशाचे अर्ज नेले. विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी पालकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, लॉटरी पद्धतीने सोमवारी सोडत काढून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त (२७८९) पट संख्येच्या कराड नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये पारंपरिक पद्धतीने दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्यास शनिवारी पहिलीची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. ४०० जागांसाठी १३८७ पालक अर्ज घेऊन गेले. राज्यात एकीकडे शासकीय शाळेत विद्यार्थ्यांविना शाळा ओस असताना कराड नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये प्रवेश मिळावा म्हणून पालकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. कराडच्या शनिवार पेठेतील मुख्य पोस्ट ऑफिसशेजारी ही शाळा क्रमांक तीन आहे. या शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन कोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून मोठी मेहनत घेतली आहे.

न्यायाधीश, डॉक्टरांसह पोलिसांची मुले शाळेत
विशेष म्हणजे शाळा क्रमांक ३ मध्ये पोलिस उपअधीक्षक, कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी, पोलिस अधिकारी, मंत्रालय अधिकारी, न्यायाधीश, डाॅक्टर, इंजिनिअर, शिक्षक, व्यापाऱ्यांची मुलेही शिक्षण घेत आहेत. जवळच्या तीन तालुक्यांतील विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत.

अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची निवड
आमच्या या शाळेतून जवाहर नवोदय स्कूल, सैनिक स्कूल सातारा प्रवेश परिक्षा, स्कॉलरशिप या परीक्षांसाठी सर्वाधिक विद्यार्थी बसतात. सातारच्या सैनिक स्कूलच्या नुकत्याच घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत आमच्या शाळेचे ४ विद्यार्थी निवडले गेले.
- अर्जुन कोळी, मुख्याध्यापक

बातम्या आणखी आहेत...