आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड हेरिटेज साइट:छत्रपती शिवरायांच्या 14 किल्ल्यांना मिळणार जागतिक वारसास्थळांचा दर्जा

अशोक अडसूळ | मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, शिवनेरी, तोरणा किल्ल्यांचा समावेश
  • युनेस्कोचे पथक लवकरच करणार पाहणी, त्यानंतर निर्णयावर होणार अंतिम शिक्कामोर्तब

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १४ किल्ल्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विभागाने म्हणजे युनेस्कोने आंतरराष्ट्रीय वारसास्थळ (वर्ल्ड हेरिटेज साइट) म्हणून तत्त्वत: मान्यता दिली असून तसे भारतीय पुरातत्त्व विभागास कळवण्यात आले आहे. छत्रपती शिवरायांना आराध्य दैवत मानून पक्ष चालवणाऱ्या राज्यातील सत्ताधारी शिवसेनेसाठी हे मोठे यश ठरणार आहे.

छत्रपती शिवरायांच्या १४ किल्ल्यांना आंतरराष्ट्रीय वारसास्थळ (श्रृंखला) म्हणून १३ एप्रिल रोजी मान्यता दिली आहे. त्यामध्ये राजगड, रायगड, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, अंकाई-टंकाई, ताेरणा, रांगणा, शिवनेरी या गिरिदुर्गांच्या शृंखलेचा समावेश आहे. त्याबरोबर सिंधुदुर्ग, कुलाबा, कांसा, सुवर्णदुर्ग आणि रत्नदुर्ग या ५ सागरी किल्ल्यांची शृंखला त्यात आहे.

मराठा लष्करी वास्तुसंरचना या प्रकारात राज्य पुरातत्त्व विभागाने भारतीय पुरातत्त्व विभागास १४ किल्ल्यांच्या शृंखलेचा प्रस्ताव पाठवला होता. केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत तो युनेस्कोला सादर झाला. त्याला नुकतीच मान्यता मिळाल्याचे कळवण्यात आले असून अंतिम प्रस्ताव पाठवा, असे युनेस्कोने केंद्र सरकारला कळवले आहे. छत्रपतींच्या साल्हेर ते जिंजीपर्यंतच्या स्वराज्यात ३५० पेक्षा जास्त किल्ले होते. त्यामुळे छत्रपतींना समकालीन इतिहासकारांनी दुर्गपती उपाधी दिली होती. इतिहासकारांनी ‘शेवटचा थोर किल्ला वास्तुविशारद’ असा शिवरायांचा गौरव केला आहे. तरी आजपर्यंत शिवरायांच्या एकाही किल्ल्याचा समावेश जागतिक वारसास्थळांत समावेश झाला नव्हता. अाता अंतिम प्रस्ताव गेल्यानंतर युनेस्कोचे पथक येईल. १४ किल्ल्यांना भेटी देणार अाहे. या स्थळांची अवस्था, त्यांच्या जतनासाठीचे नियोजन याचा विचार करून वारसास्थळाचा दर्जा देण्याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल.

राज्यात ५ वारसास्थळे : राज्यात जागतिक वारसास्थळे ५ आहेत. त्यामध्ये अजिंठा, वेरूळ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंटा लेणी, मरीन ड्राइव्ह इमारती यांचा समावेश आहे.

अाणखी किल्ल्यांच्या समावेशासाठी अाग्रह
मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात नुकतीच बैठक झाली. त्यात १४ किल्ल्यांना जागतिक वारसास्थळ म्हणून शिफारस झाल्याचे पुढे आले. आता काही जिल्ह्यांतील आमदार, मंत्री आपापल्या जिल्ह्यातील किल्ल्यांचा प्रस्ताव पाठवावा, असा दबाव राज्य पुरातत्त्व विभागावर आणत आहेत.

बातम्या आणखी आहेत...