आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गालबोट:गणपती विसर्जनाला 21 बुडून, तर सहा जणांचा अपघाती मृत्यू; मराठवाड्यात 3 जण दगावले

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, गणेश विसर्जनाला राज्यात २७ जणांच्या मृत्यूने गालबोट लागले. अहमदनगर जिल्ह्यातील सुपा आणि बेलवाडी येथे गणेश विसर्जन करताना दोन जण पाण्यात बुडाले.

नागपूर येथे विसर्जनासाठी जाणाऱ्या चार जणांचा कार अपघातात मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा गणपतीसाठी बनवण्यात आलेले स्टेज कोसळल्याने मृत्यू झाला. पुण्यात एकाचा बुडून मृत्यू झाला. सोलापुरात आनंद भूमय्या येलदी (४२) व विजय भीमाशंकर पनशेट्टी (३२) यांचा अपघाती मृत्यू झाला.

मालेगावात गिरणा नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेला अनिल भीमराव अहिरे (२५) हा तरुण वाहून गेला. कांदिवलीत मिरवणुकीत नृत्य करणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.

हिंगोली, नांदेड, जालन्यात ३ बुडाले
विसर्जनादरम्यान नदीपात्रात जाफराबादच्या लालदेव फाटा येथील बळीराम बोबडे या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला, तर दोघांना वाचवण्यात यश आले. हिंगोली तालुक्यातील घोटा येथे गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी कयाधू नदीच्या पाण्यात बुडून पुरुषोत्तम संतोष गडगीळ या १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. नांदेडच्या भोपाळा (ता. नायगाव) येथील विसर्जनास गेलेल्या शिवकुमार हत्तीनगरे (२०) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

खान्देशात सहा जणांना जलसमाधी
खान्देशात सहा जणांना जलसमाधी मिळाली. किशोर राजू माळी (२८, जामनेर) याचा मृत्यू झाला. पाझर तलावावर किशोर आत्माराम पाटील (३२) व नरेश संजय गावंडे (२०) यांचा बुडून मृत्यू झाला. चाळीसगावात सौरभ शत्रुघ्न मोरे (१७) याचा, तर पारोळ्याच्या करंजी बुद्रुक येथील गुलाब संतोष रोकडे याचा बुडून मृत्यू झाला. पाडळदे येथे अर्जुन वना साेनवणे (१८) याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

पनवेलमध्ये ११ जणांना शॉक : पनवेल येथे गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी इलेक्ट्रिक वायर पडल्याने ११ जण जखमी झाले. यात एका ९ वर्षीय मुलीचा समावेश आहे. जळगावात महापौरांच्या बंगल्यावर समाजकंटकांनी दगडफेक केली. पुणे आणि चंद्रपूर येथेही दोन गटांत बाचाबाची झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...