आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासादायक बातमी:सांगली जिल्ह्यातील 22 कोरोनाग्रस्त झाले बरे, पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली माहिती

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जयंत पाटील यांनी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांचे केले कौतुक

राज्यात कोरोनाने हाहाःकार माजवला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील 26 कोरोनाग्रस्तांपैकी 22 जण पूर्णपणे बरे झाल्याचा दावा सांगलीचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी केला. तसेच त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल स्थानिक प्रशासन आणि नागरिकांचे कौतुक केले.  पाटील म्हणाले की, इस्लामपुरात 25 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तर जिल्ह्यातील वडगाव येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. उपचारानंतर 26 पैकी 22 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. इस्लामपुरात कोरोना फैलाव रोखण्यासाठी आयसोलेशन, क्लस्टर ओळख आणि सोशल डिस्टन्स असा त्रिकोणीय दृष्टीकोन स्वीकारला गेला. कोरोनाचा सामना करण्यासाठी याला 'इस्लामपूर पॅटर्न' म्हटले जाते.   जिल्ह्यातील हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी असल्याचे सुनिश्चित केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीही इस्लामपूर व सांगलीतील लोकांचे कौतुक केले. जयंत पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, "ज्या कुटुंबांना कोरोनाव्हायरसची लागण झाली होती, ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि लोक यांच्या सहकार्याने आम्ही कोरोनाव्हायरसच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहोत."  पाटील पुढे म्हणाले की, यामुळे आम्हाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे आणि जिल्ह्यात हा विषाणू पसरणार नाही असा आत्मविश्वास आहे. परंतु लॉकडाउन अजूनही लागू आहे आणि लोकांनी ते पूर्णपणे पाळलेच पाहिजे असेही ते म्हणाले. राज्यातील जनतेने सरकारच्या आदेशाचे पालन करावे आणि कोरोनाचा पराभव करण्यासाठी घरीच राहावे असे आवाहनही पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...