आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तौक्तेचा तडाखा:आठ दिवसांपासून 30% गोवा अंधारात, 1500 झाडांची पडझड, 150 घरांचे नुकसान, तिघांचा मृत्यू

नितीश गोवंडे | पणजी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची पंतप्रधान मोदींवर टीका
  • केंद्राकडे 200 कोटी रुपयांची मदत मागितली : भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे

नुकत्याच झालेल्या तौक्ते वादळाचा फटका गुजरात, महाराष्ट्रासह गोव्याला देखील मोठ्या प्रमाणावर बसला आहे. १६ मे रोजी केरळहून गोव्यात धडकलेल्या तौक्ते वादळाने येथील सर्वसामान्य जीवन उद्ध्वस्त केले आहे. ताशी १४७ कि.मी. वेगाने आलेल्या वादळाने गोव्याच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर तडाखा देत हाहाकार माजवला.

वादळामुळे तीन जणांना प्राणही गमावावे लागले. दोन दिवस सोसाट्याचा वादळी वारा आणि मुसळधार पावसाने १५०० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली, तर १५० घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक बार्जेस भरकटल्या, १२०० पेक्षा अधिक विजेचे खांब पडले. त्यातच केळी, नारळ, कोकम, काजू आणि आंब्याच्या बागांचेदेखील मोठे नुकसान सबंध राज्यात झाले. या वादळामुळे गोव्यातील ८० टक्के वीजपुरवठा खंडित झाला होता. आज आठवडाभरानंतरही ३० टक्के गोवा अंधारात असल्यामुळे नागरिकांची विजेसह पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत आहे.

गोव्यात मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे मासेमारीच्या व्यवसायावर अनेक लोक अवलंबून आहेत. १० दिवसांत चार हजार टन मासेमारी होते. पण या वादळामुळे चार मोठ्या जेट्टी, ९४० फिशिंग बार्ज आणि ४०० पेक्षा अधिक छोट्या बोटींचे मोठे नुकसान झाले आहे. या लोकांनादेखील मदतीची नितांत गरज असल्याचे मत मासेमारी करणाऱ्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले. वादळ येण्याआधी राज्य शासनाकडून कोणतीही आपत्कालीन व्यवस्था न करण्यात आल्याने विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या गुजरात दौऱ्यानंतर गुजरातसाठी १ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, मात्र गोव्याला अद्याप एक रुपयाही जाहीर केला नसल्याने विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या शैलीचे अनुकरण करत डिचोली, बार्देश, पेडणे, सांगे, केपे आणि काणकोण तालुक्यांचा दौरा करत वादळग्रस्तांना आपत्कालीन निधीतून तातडीने मदत देण्याचे आदेश सरकारी अधिकाऱ्यांना दिले.

केंद्राकडे मदत मागितली आहे…
आजवरच्या इतिहासातील हे पहिले मोठे वादळ गोव्याने अनुभवले आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा झाली असून, केंद्राकडे २०० कोटींची मदत आम्ही मागितली आहे. ती नक्कीच मिळेल. त्यातच सध्या पर्यटन बंद असल्यामुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा ताण पडत आहे. तरीही नागरिकांचे चांगले सहकार्य प्रशासनाला मिळत आहे. - सदानंद तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

देवाच्या भरवशावर गोवा
तौक्ते वादळ येणार हे आधीपासून माहीत होते, पण डिझास्टर मॅनेजमेंटची कोणतीच व्यवस्था राज्यात करण्यात आली नव्हती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. पंतप्रधानदेखील गुजरातला भेट देतात, पॅकेज जाहीर करतात, पण गोव्याच्या बाबतीत साधे विचारतही नाहीत. सध्या गोवा हे पूर्णपणे देवाच्या भरवशावर अवलंबून आहे. गोव्याला तत्काळ मदत मिळणे गरजेचे आहे. आजवर नुसत्या घोषणा आणि आश्वासनेच देण्यात आली. - गिरीश चोडणकर, काँ. प्रदेशाध्यक्ष

आधीच कोरोना, त्यात तौक्ते…
मागील वर्षी देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य म्हणून गोवा पुढे आले े, पण अनलॉक होताच गोव्यातील आठही सीमा पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या. त्यामुळे गोव्यात पुन्हा कोरोनाने प्रवेश केला. गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतानाच तौक्तेने गोव्याला झोडपून काढल्याने केंद्रीय मदतीची गरज राज्याला आहे.

पहिल्यांदाच मोठे नुकसान
आजवर गोव्यात आलेल्या वादळांपैकी तौक्ते वादळामुळे पहिल्यांदाच गोव्याचे १४६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय आपत्ती निधीतून मदत मिळवण्यासाठी तपशील पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
साेसाट्याचा वारा-वादळात शहरात अनेक ठिकाणी विजेचे खांब जमीनदाेस्त झाले, तर झाडेही मुळासकट उन्मळून पडली.

बातम्या आणखी आहेत...