आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवर्धन:वन्यप्राण्यांसाठी 326 कोटी, तर झाडांसाठी 694 कोटी, पर्यावरण रक्षणाचा ‘समृद्धी’ पॅटर्न

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
बोर आणि पेंच अभयारण्यातील वाघांची भ्रमंती निर्विघ्न व्हावी यासाठी ‘समृद्धी’ महामार्गावर अशा प्रकारे खास टायगर ट्रॅक बांधण्यात येत अाहेत. - Divya Marathi
बोर आणि पेंच अभयारण्यातील वाघांची भ्रमंती निर्विघ्न व्हावी यासाठी ‘समृद्धी’ महामार्गावर अशा प्रकारे खास टायगर ट्रॅक बांधण्यात येत अाहेत.
  • नैसर्गिक ट्रॅक आणि भुयारी मार्ग, वन्यजीवांच्या भ्रमंतीसाठी 80 बांधकामे प्रगतिपथावर

समृद्धी महामार्गाचा ग्राउंड झीरो रिपोर्ट भाग : 3 माणसांसाठी, वाहनांसाठी पूल, भुयारी मार्ग बांधले जातात. मात्र, प्राण्यांसाठी पूल आणि भुयारी मार्ग बांंधले जाण्याचा राज्यातील पहिला प्रयोग “समृद्धी महामार्गा’च्या बांधकामात पाहायला मिळतो. एरवी पर्यावरण आणि वनविभागाच्या मंजुऱ्यांसाठी प्रकल्प रखडले जात असताना, येथील ९७ टक्के मंजुरी पूर्ण करण्यात अाली अाहे. त्यासाठी डेहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट या संस्थेसाेबत एमएसअारडीसीने करार केला. त्याअंतर्गत या महामार्गाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या काटेपूर्णा, कारंजा अाणि तानसा या तीन अभयारण्यांमधील वन्यजीवांचा मुक्त संचार अबाधित रहावा यादृष्टीने खास मार्ग बांधण्यात येत अाहेत. हरणे, काळवीट, नीलगाय यांच्यासाठी बांधण्यात येणारे भुयारी मार्ग अंतिम टप्प्यात आहेत तर हायवेच्या वरून “टायगर ट्रॅक’ बांधले जात आहेत. वन्यजीवांसाठी ३२६ काेटी रुपयांच्या निधीतून एकूण ८० भुयारी मार्ग व अाेव्हरट्रॅक बांधण्याचे काम सुरू अाहे.

इंटरचेंजनजीक सौरऊर्जा प्रकल्प
तीस इंटरचेंजेसवरील मोकळ्या भूखंडांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २५० मेगावॅटच्या ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून पहिल्या टप्प्यात १५० मेगावॅटचे उद्दिष्ट आहे.

शेततळ्यांद्वारे जलसंवर्धन
प्रकल्पाचे काम सुरू झाले तेव्हा पाणी विकत घ्यावे लागल्याचे येथील अभियंते सांगतात. मात्र, रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या मातीसाठी परिसरातील शेततळ्यांमध्ये उत्खनन करण्यात अाल्याने त्यांची खाेली वाढली. परिणामी पाण्याचा निचरा हाेऊन भूजल पातळी वाढली. तसेच शेततळ्यातील पाण्याच्या साठ्यामुळे जलसंवर्धनही शक्य झाले अाहे.

४२ कोटींचा टायगर ट्रॅक
नागपूरच्या “पॉइंट झीरो’पासून २१ किलोमीटरला वर्ध्याच्या दिशेला एका साइटवर समृद्धी महामार्गावर भल्या मोठ्या ब्रिजचे काम सुरू आहे. मूळ आराखड्यात २० मीटरचा ओव्हर ब्रिज असलेल्या या ट्रॅकचे रूपांतर वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटच्या सल्ल्यानंतर ३०० मीटरच्या टायगर ट्रॅकमध्ये करण्यात आले आहे. “समृद्धी’वरून जाणाऱ्या वाहनांचा आवाज या ट्रॅकवर पोहोचू नये यासाठी यांच्याकडेला साउंड बॅरिअर्स उभारले जाणार आहेत. या ट्रॅकवर भोवतालच्या जंगलातीलच माती व तेथीलच झुडपांची लागवड करण्यात येणार आहे.अन्य प्राण्यांसाठी व्ही डक्ट
वन्यप्राण्यांचा अधिवास जंगलातील पाणसाठ्यांच्या भोवती असतो. त्याचा विचार करून महामार्गाखालून जाणारे पाण्याचे मार्ग रुंदावून वन्यप्राण्यांसाठी व्ही डक्ट तयार करण्यात आले आहेत. येथेही पाण्याच्या ओहोळांचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवून त्याच्या भोवती स्थानिक झुडपे वाढविण्यात येणार आहेत. हरणे, काळवीट, नीलगाई यांची भ्रमंती “समृद्धी’खालून सुरळीत रहावी हा उद्देश

भुयारात नैसर्गिक प्रकाश.. अंधाऱ्या भुयारात प्रवेश करण्यास प्राणी बिचकतात या वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटच्या सल्ल्याने या भुयारी मार्गांमध्ये सूर्यप्रकाश पोहोचेल असे याचे डिझाइन करण्यात आले आहे.

११ लाख वृक्षांसाठी ६९४ कोटी झाडे जगली तर प्राणी जगतील हे पर्यावरण संतुलनातील महत्त्वाचे सूत्र. ‘समृद्धी’च्या बांधकामात दाेन लाख ३६ हजार झाडे कापण्यात आली. त्याच्या बदल्यात, पर्यावरण मंत्रालयाच्या अटींनुसार या प्रकल्पात नव्याने ११ लाख ३१ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यांचे सिंचन आणि पाच वर्षांची देखभाल यासाठी ६९४ कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...