आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी रात्री १०.२७ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. भूगर्भातून झालेल्या आवाजाने नागरिक भयभीत हाेत घराबाहेर पडले. या भूकंपाची नोंद रिश्टर स्केलवर ३.३ एवढी नोंदवली गेल्याचे सूत्रांनी सांगितले. भूकंपात जीवित वा वित्तहानीचे कुठलेही वृत्त नाही.
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ कळमनुरी व वसमत तालुक्यातील २३ गावांमधून मागील तीन ते चार वर्षांपासून भूगर्भातून मोठे आवाज होऊ लागले आहेत. दरम्यान आज रात्री १०.२७ मिनिटांनी औंढा तालुक्यातील पिंपळदरी, राजवाडी, सोनवाडी, जलालदाभा, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, वापटी, कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, शिंदगी, बोल्डा, पोत्रा या भागात मोठा आवाज जाणवला. हिंगोली, कळमनुरी शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भयभीत होऊन पिंपळदरीचे गावकरी घराबाहेर पडले. इतर गावांतही लोक जीव मुठीत धरून अंगणात आले होते. यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला असता जिल्ह्यात भूगर्भातून आवाज जाणवले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र यामुळे नुकसानीची माहिती अद्यापपर्यंत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.