आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूचा खेळ:उपकरणे नसतानाही 205 रुग्णांवर उपचार, 87 रुग्णांचा मृत्यूप्रकरणी डॉ. जाधववर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

सांगलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. महेश जाधव - Divya Marathi
डॉ. महेश जाधव
  • डॉ. महेश जाधवला 6 दिवस कोठडी;रुग्णांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी समिती

मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांच्या काळात ८७ कोरोना रुग्ण दगावल्याप्रकरणी डॉ. महेश जाधव याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली शुक्रवारी सायंकाळी सांगली पोलिसांनी नाट्यमयरीत्या अटक केली होती. शनिवारी मिरजेच्या न्यायालयात हजर केले असता त्याला गुरुवार दि. २४ जूनपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मिरजेतील अॅपेक्स केअर कोविड रुग्णालयात दोन महिन्यांत तब्बल ४५ टक्के मृत्युदराने ८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. अॅपेक्समधील रुग्णांच्या मृत्यूचे जिल्हा शल्यचिकित्सक डेथ ऑडिट करणार असून सिव्हिल मधील डॉक्टरांची समिती रुग्णांवर केलेल्या उपचारांच्या कागदपत्रांची छाननी करणार आहे. अॅपेक्स रुग्णालयातील डॉ. महेश जाधव याला सदोष मनुष्यवधप्रकरणी गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे. गतवर्षी कोविडच्या पहिल्या लाटेत महापालिकेकडून कोविड रुग्णालयाच्या परवाना घेऊन डॉ. महेश जाधव याने मिरजेतील सांगली रस्त्यावर भाड्याच्या जागेत रुग्णालय सुरू केले होते. गतवर्षीही येथे ४० टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. मात्र, येथे कोविड रुग्णांच्या झालेल्या मृत्यूची आरोग्य विभागाने गांभीर्याने दखल घेतली नसल्याने दुसऱ्या लाटेतही डॉ.जाधव याचे कोविड हॉस्पिटल बिनबोभाट सुरू होते.

औषधोपचारामुळेच मृत्यू
अॅपेक्स रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २०५ रुग्णांपैकी ८७ रुग्णांचा मृत्यू झाला असून येथील मृत्युदर तब्बल ४५ टक्क्यांपर्यंत आहे. मिरज सिव्हिलमध्ये ३५० रुग्णांवर उपचार सुरू असून मे महिन्यात २० टक्के व सध्या १५ टक्के मृत्युदर आहे. अॅपेक्स रुग्णालयाचा मृत्युदर सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून चुकीच्या औषधोपचारामुळे हा मृत्युदर सर्वाधिक आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

रुग्णांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी समिती
रुग्णालयात केलेल्या उपचारांच्या चौकशीसाठी मिरज सिव्हिलचे डॉ. शिशिर मिरगुंडे यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. येथील रुग्णांच्या मृत्यूचे डेथ ऑडिट जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत होणार आहे. पोलिसांनीही रुग्णांच्या मृत्यूच्या चौकशी अहवालाची मागणी केली आहे. कोविड साथीदरम्यान रुग्णांवर उपचारासाठी बेड कमी पडू नयेत, यासाठी प्रशासनाने मागेल त्यास कोविड रुग्णालयाची परवानगी देत होते.

उपकरणे नसतानाही २०५ रुग्णांवर उपचार
उपचाराबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारींमुळे मनपा प्रशासनाने कारवाईचा पवित्रा घेतला. त्यानंतर डॉक्टरने रुग्णांच्या जिवाशी केलेला खेळ उघडकीस आला आहे. अॅपेक्स कोविड रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय उपकरणे नसतानही दोन महिन्यांत २०५ रुग्ण दाखल करून घेण्यात आले. त्यापैकी ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. काही अत्यवस्थ रुग्णांना शासकीय रुग्णालय व अन्यत्र पाठविण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे.

बातम्या आणखी आहेत...