आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात यंदा वेळेत चांगला पाऊस सुरू झाला आहे. २६ जुलैपर्यंत १२३.५% पर्जन्यमान झाले. त्यामुळे १४२ लाख ८८ हजार ४१८ हेक्टर (ऊस क्षेत्र वगळून) क्षेत्रापैकी १२७ लाख ४४ हजार ८५१ हेक्टरवर म्हणजे ८९% खरीप पेरणी वेगात पूर्ण झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन ११०%, कापूस ९७% व तेलबिया १०८ % क्षेत्रावर पेरणीला सर्वाधिक महत्त्व दिल्याचे स्पष्ट झाल्याचे कृषी विभागाने सांगितले.
ऊस पिकासह राज्यात १५३ लाख ८८ हजार ४१७ हेक्टर सरासरी खरीप क्षेत्र आहे. गतवर्षी २७ जुलैपर्यंत १२९ लाख १६ हजार ५७३ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. यंदा १३० लाख ७ हजार ४२७ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणीत अमरावती विभाग अव्वल असून ९५% तर औरंगाबाद व लातूर कृषी विभागात ९३%, नागपूर ८९ टक्के, कोल्हापूर ८८ टक्के, नाशिक ८८ टक्के, पुणे ८७ टक्के आणि कोकण विभागात ६९% खरीप पेरण्या पूर्ण झाल्या. अतिवृष्टीमुळे डबल पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे.
हवामानातील बदलाचे यंदा जास्त परिणाम
यंदा हवामान बदलामुळे महाराष्ट्रात २३.५% जास्त पाऊस पडला आहे. पुणे जिल्ह्यात सरसरीपेक्षा १७% कमी पाऊस पडला आहे. जून महिन्यात खंडाचे प्रमाण अधिक राहिले. तरी मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. अतिवृष्टीमुळे १० लाख हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
आता एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शेती मशागत, हवामानातील बदल, हवामान अंदाज, पाऊस, वीज, वादळ, पेरणी, अंतर्गत मशागत, कीड व रोगांचे प्रादुर्भाव, उपाययोजनांबाबत कृषितज्ज्ञ, हवामानतज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना वेळेवेळी एसएमएसद्वारे सूचना व मार्गदर्शन केले जात आहे.
दोन वर्षांत ४.१८ लाख हेक्टर पेरा वाढला : कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे तेलबिया वर्गातील प्रमुख पीक म्हणून सोयाबीन शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. यंदाही पेरणी क्षेत्रात १ लाख ७८ हजार ६०३ हेक्टरने वाढ होऊन प्रथमच ४५ लाख ६१ हजार ५०५ हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली असून गत दोन वर्षांत ४ लाख १८ हजार १२३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. कपाशीची लागवड घसरली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.