आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • A Bill Of Lakhs To A Patient At The Kohinoor Hospital In Kurla; Opposition Leader Pravin Darekar Exposed The Case

हॉस्पीटलची लुटमार:कुर्ला येथील कोहिनूर रुग्णालयात रुग्णाला लाखोंचे बिल; विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी प्रकरणाचा केला पर्दाफाश

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दरेकर यांच्यासह मंगलप्रभात लोढा यांची रुगणालयाला भेट

कुर्ला कोहिनूर येथील एका सामान्य रुग्णाला सतरा लाख दहा हजाराचे बिल आल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज दुपारी रुग्णालयाला भेट दिली व या गंभीर प्रकाराचा पर्दाफाश केला. त्यामुळे हॉस्पिटलचे प्रशासन ताळ्यावर आले. त्या रुग्णाला लाख रुपयाचे अवाजवी बिल आकारल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर बिल कमी करण्यात आले. अशा पद्धतीची लूट खासगी रुग्णालयात सुरू असून ही लूट थांबविण्याचे आवाहन प्रविण दरेकर यांनी केले. तसेच मुंबईतील अशा खासगी रुग्णालयांच्या लुटमारी संदर्भात दोन दिवसात मुंबईच्या महानगरपालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही प्रविण दरेकर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यांच्यासमवेत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, "खाजगी हॉस्पिटलची कार्यपद्धती आज उघडकीस आली असून किती भयानक पद्धतीने बिल आकारले जाते, याचे मूर्तिमंत उदाहरण एका सामान्य रुग्णाच्या बिलाच्या माध्यमातून उघडकीस आले आहे. रामचंद्र दरेकर असे या रुग्णाचे नाव आहे. एका महिन्याचे बिल १७ लाख १० हजार आकारण्यात आले. यांसदर्भात आपण आणि मंगल प्रभात लोढा येथे येणार आहे, कळल्यानंतर हे बिल १३ लाखांपर्यंत कमी करण्यात आले. या १३ लाखाच्या बिलाची विभागवारी मागितली असता, २ लाख रुपये हे फक्त पीपीई किटचे दाखविले आहेत. साधारणतः एका पीपीई किटला २७०० रुपये आकारले आहेत, त्याची बाजारात ३०० रुपये किंमत आहे. रुपये ४०० ते ५०० इंजेक्शनसाठी आकारले आहेत. पण ८२ वर्षाचा रुग्ण आहे. त्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात इंजेक्शन्स कार्यान्वित होऊ शकतात का ? हाही एक प्रश्न उपस्थित होतो. दीड ते २ लाखाचे बिल हे १७-१८ लाख रुपयांवर जाते यापेक्षा गोरगरिबांची लूट काय असू शकते. अशाप्रकारचे भयानक वास्तव कोहिनूर रुग्णालयाच्या माध्यमातून उघडकीस आले आहे.

फायर ब्रिगेडमधून सेवानिवृत्त झालेले हे रुग्ण,ज्यांनी आपले सर्व आयुष्य लोकांचे जीव वाचविण्यासाठी खर्ची घातले. त्यांचा जीव वाचू शकला नाहीच, उलट सतरा - अठरा लाखांचे बिल येणे. यासारखा सेवेचा आणि सर्वसामान्य जनतेचा अपमान काय असू शकतो ? असा गंभीर प्रश्नही प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

"या लुटीवर महापालिकेचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. फक्त बेड द्यायचे. पण वैदयकीय साहित्य, औषधे कितीला खरेदी करायचे यावर ना पोलिसांचे नियंत्रण, ना सरकारचे नियंत्रण. त्यामुळे आम्ही ५० बेड आरक्षित केले म्हणजे आम्ही गरिबांसाठी काहीतरी केले, या महापालिकेच्या दाव्याला काही अर्थ नाही. कारण बेड ज्या कमी किंमतीला ठरूवून दिले आहेत त्याची अधिकची वसुली विविध पद्धतीच्या औषधांच्या किंमतीच्या माध्यमातून केली जात आहे. असे हे विदारक चित्र उघड झाले आहे. म्हणजे २ लाखाची पीपीई किट लागणे म्हणजे एका रुग्णाला दिवसातून ३ वेळा पीपीई किट घालून तपासणे असे अर्थ होतो, पण एक पीपीई किट घालून एक डॉक्टर एकावेळी २५ ते ५० रुग्णांना तपासू शकतो. अशाप्रकारे पळवाट काढून सर्वसामान्य रुग्णांची लूट खाजगी रुग्णालयांकडून केली जाते. हे भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही.

याआधी आपण बोरिवलीच्या अँपेक्स हॉस्पिटल मध्येही असे प्रकरण उघडकीस आणले. कांिवलीच्या पार्थ हॉस्पिटलचे प्रकरण काढले, ठाण्यातही असे लूटमारचे प्रकार घडत आहेत, त्यामुळे आता भाजपच्यावतीने मुंबईतील सर्व खासगी हॉस्पिटलचा लेखाजोखा घेण्यात येईल," असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज दुपारी कोहिनूर रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालायच्या वतीने रुग्णालयाचे उपाध्यक्ष अतुल मोडक उपस्थित होते. दरेकर यांनी यावेळी रुग्णाला पाठविण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या बिलाची माहिती मोडक तसेच प्रशासकीय अधिका-यांना विचारली. त्यानंतर वैदयकीय उपचारासह अन्य वैदयकीय साहित्याचे अवाजवी बिल रुग्णालयाकडून आकारल्याचे यावेळी दरेकर यांनी सिध्द करुन दाखविले.

याप्रसंगी सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र पाटील, कुर्ला पश्चिम येथील विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश पवार, भाजपा उत्तर मध्य जिल्हा अध्यक्ष, नगरसेवक सुषम सावंत, नगरसेवक हरिष भांदिर्गे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...