आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तळोद्यात सिंह?:तळोद्यात शेतकऱ्याने केला सिंह पाहिल्याचा दावा, वन्यजीव तज्ज्ञांच्या टीमने केली घटनास्थळाची पाहणी; ठश्याचे नमुने घेतले

सुनील सूर्यवंशी, तळोदा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवारात उमाकांत शेंडे यांच्या शेतात एकाच दिवसात सिंह सदृश्य व नर मादी बिबट यांचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच दिवसात 2 हिंस्त्र प्राण्यांच्या दर्शनाने घबराट पसरली आहे तर चक्क सिंहाचा वावर परिसरात आढळल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. बिबट्याच्या पायाच्या ठश्या पेक्षा मोठ्या आकाराचे ठसे दिसून आल्याने वनविभागाने देखील पुष्टी दिली असून पुढील तपासासाठी व खात्री करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार असून ठश्याचे नमुने तज्ञांकडे पाठवणार असल्याचे वनक्षेत्रपाल रोडे यांनी सांगितले. दरम्यान वन विभाग कडून अधिकृत कोणतेही माहिती देण्यात आलेली नाही.

याबाबत अधिकवृत्त असे की, तळोदा शिवारातील उमाकांत वसंत शेंडे व त्यांचे बंधू शशिकांत वसंत शेंडे हे नेहमीप्रमाणे गुरुवारी शेतात फेर फटका मारण्यासाठी गेले असता पहाटे 6 वाजेच्या सुमारास शेताच्या बांधावर सिंह बसला असल्याचे त्यांचा लक्षात आले. त्यांनी पुढे न जाता त्यावर नजर ठेवून त्याच्या हलचालीकडे लक्ष ठेवले, दरम्यान 1 तासाच्या अवधींनंतर सिंह तिथून निघून गेला. त्यानंतर काही क्षणातच थोडे पुढे गेल्यावर बिबट नर व मादी एका झाडावरून उतरताना त्यांना दिसले. अवघ्या काही क्षणात सिंह व बिबट्याचे दर्शन झाल्याने भयभीत अवस्थेत त्यां दोघांनी घर गाठले व आपल्या मुलांच्या माध्यमातून सदर घटना तात्काळ वनविभागाला कळविली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता क्षणाचा विलंब न करता वनक्षेत्रपाल निलेश रोडे, वनरक्षक विरसिंग पावरा, गिरधर पावरा, वासुदेव माळी यांच्यासह कैलास शेंडे, शिवम शेंडे, सचेत शेंडे, तिरथ शेंडे, कुशल सूर्यवंशी, भरत सूर्यवंशी आदींनी जाऊन पाहणी केली व ठस्याचे नमुने घेतले. दरम्यान झाडावर बिबट्याचे नख्यांचे ठसे व ठिकठिकाणी पायांचे ठसे आढळून आले. तर बांधाजवळ ठसे पाहिले असते ते आकाराने मोठे आढळून आल्याने वनविभागाचे कर्मचारी देखील बुचकळ्यात पडले.

शेतामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे कळताच परिसरात घबराट पसरली. शेतांमध्ये बिबट्याच्या भीतीने मजूर जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. जिवाची भीती असल्याने खुद्द शेतमालकानाही शेतात पाणी भरण्यासाठी, मशागतीसाठी जाता येत नसल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. गस्‍त घालण्यासाठी पथकशेतकऱ्यांनी वन विभागाकडे बिबट्याचा वावर असलेल्या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली. मात्र पिंजरा लावण्यासाठी वन विभागाचे स्वतंत्र निकष आहेत. जिल्हा स्तरावरून परवानगी मिळाल्याशिवाय पिंजरा लावता येत नाही. याबाबत वरिष्ठांशी बोलणी सुरू असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात ट्रॅप कॅमेरा लावणार असून सकाळी व सायंकाळी गस्त घालण्यासाठी पथकाची नियुक्ती केली असल्याचे वनक्षेत्रपाल निलेश रोडे यांनी सांगितले.

मात्र या उपाययोजना तोकड्या असून शेतकऱ्यांना जीवाची हमी देण्यात वनविभाग अपयशी ठरल्याची प्रतिक्रिया या भागातील शेतमालकांनी दिली. जीवाची जोखीम घेऊन शेतांमध्ये जाण्याची वेळ येऊ देण्याऐवजी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मागील शनिवारी 4 सप्टेंबर रोजी तळोदा शहराच्या वेशीवर बिबट्याचे दर्शन झाले होते. आठवडा उलटला नाही तोवर अगदी लोकवस्ती हाकेच्या अंतरावर असलेल्या तळोदा शिवारात चक्क सिंहाचा वावर दिसल्याने प्रचंड भीती निर्माण झाली आहे. वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सदर प्राणी हे एकाच ठिकाणी राहत नसून जागा बदलत असतात त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही कुठेही प्राणी आढळल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.

बिबटच्या पंज्याच्या आकारापेक्षा मोठ्या आकाराचा पंजा दिसून येत असल्याने सिंह असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने पुढील तपासासाठी व खात्री करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावणार आहेत. याशिवाय ठश्याचे नमुने तज्ञांकडे सादर केले आहेत. : निलेश रोडे, वनक्षेत्रपाल वनविभाग तळोदा

शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलो असता सिंह साधारणतः 100 मीटर अंतरावर बांधावर बसून होता. दरम्यान त्याची जाण्याची वाट पाहिली तो तेथून निघून गेल्यावर पुढे जाण्यासाठी निघालो असता काही क्षणातच अचानक झाडावरून बिबट्याचे जोडपे खाली उतरले व डरकाळ्या फोडून भांडण करू लागले. सदर प्रसंग हा खूपच थरारक होता. आम्ही दोघे खूपच घाबरलो होतो. - शशिकांत शेंडे, शेतकरी तळोदा

दरम्यान दुर्मिळ वन्यजीव तज्ञ तथा वन विभागाचे मानद सचिव विवेक देसाई जळगांव यांना सदर वन्यजीव चे ठसे अस्पष्ट असल्याने सदर वन्यजीव हा सिंहच आहे असे सांगणे अवघड असून सिंह हा वन्यजीव गुजरात राज्यात मोठ्या संख्येने आढळून येत असला तरी हा जीव समूहाने संचार करत असतो त्यामुळे सदर जीव सिंहचं असणे सांगणे अवघड आहे.

तर्क वितर्क-
एकांत आणि शांतता असणाऱ्या भागात असणारे हे वन्यजीव पहाटे अथवा संध्याकाळी उशिरा व मध्यरात्री नंतर दृष्टीस पडतात त्यामुळं अनेकदा तरस ला बिबट समजलं जातं तसेच बिबट ला पट्टेदार वाघ समजलं जातं वेळोवेळी पट्टेदार वाघ दिसल्याचा दावा देखील केला जातो.

आता मात्र शेजारील गुजरात राज्यात आढळणाऱ्या जंगलाचा राजा सिंह दिसल्याचा दावा होत असल्याने या बाबतीत वन विभागाने सत्यता समोर आणावी अशी मागणी वन्यजीव प्रेमी मधून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...