आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:लोक सहभागातून 72 तासांत उभारले नायगावात सुसज्ज काेविड केअर सेंटर, नांदेड जिल्ह्यात सोशल मीडिया ग्रुपमधील चर्चेतून साकारला उपक्रम

नांदेडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नांदेडमध्ये गंभीर रुग्णांनाही शासकीय व खासगी रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले आहे.

मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यात नांदेड जिल्ह्यात तर पॉझिटिव्ह रुग्ण व मृतांची संख्या प्रचंड झाली. काही दिवसांपूर्वी तरी बेड मिळत नसल्याचे चित्र होते. अशा स्थितीत सरकार, राजकीय नेते किंवा प्रशासनावर सर्व जबाबदारी न ढकलता लोकच लोकांच्या मदतीला धावून आले. सोशल मीडियातील ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या लोकांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अवघ्या ७२ तासात नायगावमध्ये ५० बेडच्या कोविड सेंटरची उभारणी केली. राजकीय विचारांना फाटा देत सामाजिक सलोखा जपत तरुणांनी लोकसहभागातून उभारलेले कोविड सेंटर इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

नांदेडमध्ये गंभीर रुग्णांनाही शासकीय व खासगी रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले आहे. ही चर्चा ‘आवाज नायगावाचा’ या २५७ सदस्य असलेल्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर झाली. या ग्रुपमध्ये अनेक व्यापारी, खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांचा समावेश आहे. या सर्वांनी शासनाच्या आदेशाची किंवा निधीची वाट न बघता दररोज मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांना वाचवण्यासाठी लोकसहभागातून ‘कोविड सेंटर’ उभारण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला. बघता बघता देणगीदारांची संख्या वाढत गेली.

करमणुकीसाठी ‘एलसीडी’ प्रोजेक्टर
प्रत्येक खोलीमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आला. याशिवाय रुग्णांच्या करमणुकीसाठी एलसीडी प्रोजेक्टर बसविण्यात आले आहे. सायंकाळी मैदानावर सर्वजण याचा आस्वाद घेतात. तसेच खेळण्यासाठी क्रीडा साहित्य, योगासाठीही मार्गदर्शन करण्यात येते.

असे साकारले कोविड केअर सेंटर
निधी संकलनानंतर वैद्यकीय सेवेचा प्रश्न निर्माण झाला? अशा वेळी स्थानिक डॉ. विश्वास चव्हाण व डॉ. मधुसूदन डिग्रसकर यांच्या टीमने सर्वस्वी जबाबदारी स्वीकारली. मेडिकल असोसिएशनने औंषधीचा पुरवठा, ऑक्सिजन सिलिंडरसाठी सभापती संजय बेळगे, बुलडाणा बँकेकडून २४ तासांसाठी रुग्णवाहिकेची सोय, तर सेंटरच्या उभारणीसाठी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी ‘लिटल स्टेप’ शाळा कुठलेही भाडे न आकारता देऊन टाकली. तसेच जेवणासाठी उपनगराध्यक्ष विजय चव्हाण यांनी दोन वेळचे जेवण, एक वेळ नाष्टा, काढा, चहा याशिवाय अंडी, हळदीचे दूध देण्याची व्यवस्था केली.

स्वच्छतेसाठी नगर पंचायतचे सहकारी, नगर पंचायतचे गटनेते सुधाकर शिंदे यांनी रुग्णांसाठी वाफेच्या मशीन दिल्या. बाजार समितीकडून कुलरची व्यवस्था झाली. सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष प्रदीप पाटील कल्याणकर यांच्याकडून गरम पाण्यासाठी गिझरची सोय करण्यात आली., अशा देणगीदारांच्या माध्यामातून जिल्हा प्रशासनाच्या ४८ (२१ एप्रिल रोजी) तासांतील परवानगीनंतर ७२ तासांत (२४ एप्रिल रोजी) ‘साई माउली सार्वजनिक कोविड केअर सेंटर’ आकारला आले. तसेच अतिगंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा रुग्णालयात या सेंटरमधील रुग्णांसाठी बेड राखीव ठेवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. सध्या २७ ते २८ रुग्ण उपचार घेत आहेत.

दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांची मदत
सेंटर उभारणीसाठी ९९ ते २००० च्या जनता हायस्कूलच्या दहावीच्या बॅचनेही सव्वा लाखाचा निधी दिला. सेंटरच्या नावाने खाते काढून लेखापरीक्षण केले जात आहे. बॅनरसारख्या अनावश्यक खर्च टाळण्यात आला. बिलोली तालुक्यात सगरोळी, उमरी, धर्माबाद तालुक्यातून लोकांनी व इतर जिल्ह्यातील लोकांनी माहिती घेतल्याचे ग्रुप अ‍ॅडमिन नागेश कल्याण, नगरसेवक पांडुरंग चव्हाण, धनराज शिरोळे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...