आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगा व्यवस्थित करताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू:बीडमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल; आईचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश!

केज (बीड)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरावर लोखंडी अँगलला लावलेला तिरंगा ध्वज वाऱ्याने कलल्याने तो व्यवस्थित करताना शॉक लागून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वरपगाव ( ता. केज ) येथे 13 ऑगस्ट रोजी घडली. मुक्तार अशोकाद्दीन शेख असे मृत तरुणाचे नाव आहे.

आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यात आईचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश अंगावर शहारे आणतो. मात्र, आजूबाजूला असलेल्यांपैकी अनेकजण व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते.

कशी घडली घटना?

केज तालुक्यातील वरपगाव येथील मुक्तार अशोकाद्दीन शेख ( वय 30 ) या तरुणाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. त्याचे कुटुंब शेतात पत्र्याच्या वास्तव्यास असून त्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त इतरांप्रमाणे 13 ऑगस्ट रोजी घरावर लोखंडी अँगलला तिरंगा ध्वज लावला होता. दुपारी 12ः30 वाजेच्या दरम्यान तो कळंबकडे निघाला असता त्याला घरावर लावलेला झेंडा कललेला दिसला. तो व्यवस्थित करण्यासाठी छतावर गेला. त्याचवेळी घराजवळून गेलेल्या विद्युत तारेला लोखंडी अँगलचा स्पर्श झाल्याने मुक्तार शेख यास विजेचा शॉक बसला.

वाटेतच मृत्यू

शेखला उपचारासाठी घेऊन येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिंचोलीमाळी बिटचे जमादार राजू गुंजाळ, पोलिस नाईक चंद्रकांत काळकुटे यांनी रुग्णालयात धाव घेत शवविच्छेदन करून घेतले.

अकस्मात मृत्यूची नोंद

केज पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सर्वत्र अमृत महोत्सवाची धूम असताना शेख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आहे.

बातम्या आणखी आहेत...