आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • After His Anti Maharashtra Remarks, Governor Bhagat Singh Koshyari Became The Subject Of Criticism From All Political Parties | Marathi News

महाराष्ट्राची अस्मिता:महाराष्ट्रविरोधी वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बनले सर्व राजकीय पक्षांच्या टीकेचे धनी

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातून विशेषत: मुंबई, ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना बाहेर काढले तर महाराष्ट्रात पैसा उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखली जाणार नाही, असे मराठी माणसांना कमी लेखणारे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांनी केल्याने त्यांना महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांसह विविध संघटनांच्या राेषाला सामाेरे जावे लागत अाहे. राज्यपालांच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. एवढेच नव्हे तर सत्ताधारी भाजपनेही या वक्तव्यावर हात वर करत राज्यपालांनी जबाबदारीने बोलले पाहिजे, अशी भूमिका घेतली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने राज्यपालांच्या या वक्तव्याची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. केवळ भाजप नेते नितेश राणे आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र कोश्यारींच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करत एकप्रकारे भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवण्याची व या ठिकाणी महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारी योग्य व्यक्ती नेमावी, अशी मागणी केली आहे.

राज्यपालांनी महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी जे विधान केले ते अतिशय चुकीचे आहे, असे म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नका करू दुनियादारी, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि राज्याचे प्रवक्ते हेमंत संभूस यांनी पुण्यात बोलताना केली. मुंबईतील गुजराती आणि राजस्थानी व्यापारी वर्तुळाने राज्यपालांच्या विधानाला विरोध केला आहे. बोरिवलीच्या राजस्थानी आणि गुजराती व्यापारी मंडळांनी राज्यपालांच्या विधानाला भांडणाचे विधान म्हटले आहे. मुंबईची आर्थिक राजधानी सर्वांच्या सहकार्याने बनली आहे, त्यामुळे कुणी बाहेर गेले तर काही फरक पडेल, असे राज्यपालांचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

यांना नारळ द्यायला हवा
राज्याचे राज्यपाल त्याच राज्यातील जनतेचा अपमान करतात हे भयानक आहे. गुजराती, राजस्थानी विषय राहू द्या. सर्वांत आधी यांना नारळ द्यायला हवा. कोश्यारी यांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला.
-सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते

काळजी घ्यावी
राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. या पदावर बसलेल्या व्यक्तीने बोलताना असे विधान करताना काळजी घेतली पाहिजे. मुळात राज्यपाल हे पद पक्षविरहित असून राज्यपाल हे राज्याचे पालक असतात.
-सुषमा अंधारे, शिवसेना उपनेत्या.

लवकर माफी मागावी
महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. आपण मराठी माणसाचा अपमान केला. माफी मागा.
-अमोल मिटकरी, राष्ट्रवादी प्रवक्ते

वक्तव्य अप्रस्तुत
आदरणीय राज्यपाल यांनी वाद होईल असे वक्तव्य करणे शक्यतो टाळावे. राज्यपालांचे मुंबईबद्दलचे हे वक्तव्य अप्रस्तुत आहे. देशभरातील सगळ्यांचेच मुंबई हे आवडते शहर असून या शहरात अनेक नामवंत राहत असल्याने या शहराला विशेष महत्त्व आहे. मुंबईत सर्व प्रकारचे लोक आहेत.
-छगन भुजबळ, राष्ट्रवादी नेते

कमी लेखणारे विधान
कोश्यारी यांचे विधान मराठी माणसांना कमी लेखणारे आहे. त्यांच्या विधानाचा मराठी माणूस म्हणून मी निषेध करते. याच मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले. लाखो मराठी माणसांच्या वज्रमुठीमुळे हे शहर उभे राहिले आहे. राज्यपाल महोदयांचे हे विधान त्या हुतात्म्यांचा अवमान करणारे आहे.
-सुप्रिया सुळे, खासदार

मुंबई त्यांनी आंदण दिली नाही!
मराठी अमराठी असा वाद लावण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे कोश्यारी नावाचे हे पार्सल परत पाठवले पाहिजे. ज्या महाराष्ट्राचे मीठ तुम्ही तीन वर्षे खात आहात त्या मिठाशी तुम्ही नमक हरामी केली आहे. जे नवहिंदूवादी आहेत. ज्यांना हिंदुत्वाचे मोड फुटले आहेत. ते कडवे असतील तर त्या मोडधारी, सत्ताधारी हिंदूंना ते हिंदू असतील आणि मराठी असतील तर राज्यपालाविषयी भूमिका घेतली पाहिजे. कोश्यारींना तुरुंगात पाठवणार की घरी पाठवणार. राज्यपाल म्हणून त्या खुर्चीचा मान राज्यपालांनी ठेवला पाहिजे. पण त्या खुर्चीत बसवलेल्या कोश्यारींनी त्या खुर्चीचा मान ठेवला नाही. गेल्या तीन वर्षांतील त्यांची विधाने असतील, काही त्यांचे कॅमेऱ्याने टिपलेली दृष्ये असतील ते पाहिल्यावर महाराष्ट्राच्या नशिबी अशी माणसे का येतात? त्यांची भाषणं कोण लिहून देत माहीत नाही. मुंबईतून लिहिली जातात की दिल्लीतून लिहून येतात हे माहीत नाही. शिवाजी महाराज आणि साधू संताची पावले लागलेला हा महाराष्ट्र आहे. ही मुंबई कोश्यारींनी आंदण दिलेली नाही. तर ही संयुक्त महाराष्ट्रातील लढ्यातून मिळालेली मुंबई आहे.
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख.

नेत्यांचे राजकारण उघडे पाडले
राज्यपालांचे वक्तव्य चुकीचे नाही. मी त्यांच्या विधानाचे समर्थन करतो. त्यांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान झाला नाही. उलट नेत्यांचे राजकारण उघडे पडले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यावरची झापडं उघडली.
-अॅड. प्रकाश आंबेडकर

बातम्या आणखी आहेत...