आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ते 30 तास...:निसर्ग, कोरोनापाठोपाठ तौक्ते; वर्षभरात कोकणाला तिसरा तडाखा, अर्थव्यवस्थेचे मोडले कंबरडे

महेश जोशी, नितीश गोवंडे | रत्नागिरी / चिप‌ळूण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वीज ठप्प, घराघरात अंधार, झाडे उन्मळून पडली, शेती- मालमत्तेचे प्रचंड नुकसान

गेल्या वर्षी धडकलेले “निसर्ग’ चक्रीवादळ आणि कोरोनापाठोपाठ रविवारपासून घोंघावत असलेल्या “तौक्ते’ चक्रीवादळाने कोकणाचे कंबरडे मोडले. निसर्गाच्या या संकटाने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेती आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान केले. वीज ठप्प असल्याने घराघरात अंधार आहे. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी गावागावात नागरिकांनी जागता पहारा दिला. सोमवारी “तौक्ते’ पुढे सरकल्यानंतर ३० तासांनंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. निसर्ग नेहमी आमच्यावरच का कोपतो? असा येथील नागरिकांना प्रश्न पडलाय.

“तौक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात झालेल्या परिणामांचे वार्तांकन करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधी कोकणात आहेत. हे चक्रीवादळ किनारपट्टीहून १५० ते २०० किलाेमीटर समुद्रात असल्याने त्याचा फार फटका बसणार नाही, असा ग्रामस्थ आणि प्रशासनाचा कयास होता. प्रत्यक्षात यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

जनजीवन ठप्प : चक्रीवादळाचे परिणाम पुण्यापासूनच जाणवायला लागले. रविवार संध्याकाळपासून पुणे, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार वाऱ्यासह दमदार पाऊस सुरू होता. यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते, तर ओढे, नाले आणि नद्या ओसंडून वाहत होत्या. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. झाडे पडल्याने विजेचे खांब वाकडे झाले, तारा जमिनीवर पसरल्या. सुरक्षिततेसाठी काही ठिकाणी प्रशासनाने रविवार सकाळपासून वीजपुरवठा बंद केला. सोमवारी संध्याकाळपर्यंत वीज दुरुस्ती आणि झाडे बाजूला करण्याचे काम सुरू होते. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळे येथे एक विशाल वृक्ष पडत असताना दिव्य मराठी प्रतिनिधींची कार थोडक्यात बचावली.

शेतात पाणीच पाणी.. कोरोनामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गात कडक लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद आहेत. एक जूननंतर परिस्थिती सामान्य होईल असे वाटत असताना नव्याने आलेल्या या संकटाने आम्हाला वर्षभर मागे नेल्याचे रत्नागिरी तालुक्यातील कुंभारले घाटमाथा गावातील आनंदा आणि उमेश लांबोर यांना वाटतेय. एरवी आम्ही भातशेतीच करतो. यंदा पहिल्यांदा तीन एकरावर भुईमुगाची लागवड केली. चार दिवसांवर माल काढणीला आला होता, पण पावसाने शेत पाण्यात गेल्याने सर्व मातीमोल झाले. आता हे काढून नव्याने लावण्यासाठीही पैसे नसल्याचे आनंदा म्हणाले. ते घाटमाथा येथे हॉटेल चालवतात. पूर्वी दरराेज १२००-१५०० चा धंदा व्यायचा, आता २०० रुपयेही मिळत नसल्याचे ते म्हणाले.

चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अंजनवेल येथे संतोष जोशी यांचा एक जुना वाडा पडला. वाऱ्याने एका घराचे पत्रे उडून गेले.

तीन वाचले, चार बेपत्ता

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तौक्तेमुळे रविवारपासून राज्यात एकूण ६ मृत्यू, तर ९ जण जखमी झाले. देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून जात असल्याने त्यांना वाचवण्यासाठी दुसरी बोट गेली. पण दोन्ही खडकावर आदळल्या. दोन्ही मिळून ७ प्रवासी होते. पैकी ३ वाचले, तर ४ वाहून गेले.

आम्ही निसर्गाचे पूजक, तरी...
चिपळूण येथील प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश साठे म्हणाले, कोकणातील माणसे नेहमीच निसर्गाचे पूजक राहिली आहेत. समुद्राला देव मानतो. तरी आमचा देव आमच्यावर का कोपतो? गेल्या मार्चपासून कोरोना, मग निसर्ग आणि आता तौक्तेने पार कंबरडे मोडले आहे. जगणे कठीण झाले आहे.

बोटी उलटल्या..
गुहागार येथील घनश्याम राणे यांंच्याकडे ६ बोटी आहेत. पैकी ५ ते किरायाने देतात. मासेमारी किंवा पर्यटकांना फिरवण्यासाठी त्या चालतात. २२ एप्रिलला लॉकडाऊन लागण्याआधीपासूनच गुहागर नगर परिषदेने समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना बंदी केली आहे. आधी पर्यटकांचा व्यवसाय बुडाला. रविवारी सुटलेल्या जोरदार वाऱ्याने किनाऱ्यावर लावलेली एक बोट उलटी केली, तर किरायाने दिलेली एक वाहून गेली. कमाई तर दूर, बोटींचे नुकसान झाल्याची त्यांना चिंता वाटतेय.

डेअरीचे नुकसान..
चिपळूण येथील डेअरी व्यावसायिक समाधान मुळे म्हणाले, आम्ही समुद्रापासून ४८ किलोमीटर दूर आहोत. पण सोसाट्याचा वारा आणि पावसाने कालपासून चिंतेत होतो. दूध अत्यावश्यक सेवेत असले तरी लॉकडाऊनमुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. चक्रीवादळाच्या भीतीमुळे लोक घराबाहेर न पडल्याने रविवारी दूध वाया गेले.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला चक्रीवादळाने चांगलेच झाेडपून काढले. या वादळाचा फटका बसून झालेल्या नुकसानीचा ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींचा कोकणातील हा रिपाेर्ट...

बातम्या आणखी आहेत...