आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवार एकीकडे भूमिकेवर ठाम:म्हणाले - छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच; दुसरीकडे शरद पवारांच्या भूमिकेशीही सहमत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हेत, तर स्वराज्यरक्षकच आहेत, असे वक्तव्य विधानसभेत केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर अखेर भूमिका स्पष्ट करत अजित पवार यांनी पडदा टाकला. एकीकडे आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत म्हणतानाच, दुसरीकडे शरद पवारांच्या भूमिकेशीही सहमत असल्याचे सांगत भाजपला शांत करण्याचा प्रयत्न केला.

अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच राज्यपालांसह भाजपच्या ज्या नेत्यांनी महापुरुषांविषयी बदनामीकारक विधाने केली, त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.

अशी झाली सुरुवात?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक असा उल्लेख केला. त्यामुळे भाजपने आकाशपाताळ एक करत राज्यभर आंदोलन सुरू केले होते. दुसरीकडे त्यानंतर लगेचच युवराज संभाजीराजे भोसले यांनी अजित पवार यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगितले. शिवाय छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर होते, असे म्हणाले. त्यामुळे भाजपच्या आंदोलनाला धार चढली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

स्वराज्यरक्षक का ते सांगितले...

अजित पवार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक का म्हटले जावे, यासाठीची काही कारणेही आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी होते. छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्वांसाठी असलेल्या या स्वराज्याचे रक्षण केले. त्यामुळे त्यांना स्वराज्यरक्षक म्हणणे हेच व्यापक आणि अर्थपूर्ण असल्याचे म्हणाले.

पवारांच्या भूमिकेशीही सहमत

अजित पवारांनी यावेळी आपण शरद पवार यांच्या विधानाशाहीही सहमत असल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर काल शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षकासोबतच धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगे नसल्याचे सांगितले होते. या भूमिकेशीही अजित पवार यांनी आज सहमती दर्शवली.

काही स्वतःलाच धर्मवीर म्हणतात

दुसरीकडे धर्मवीर या पदवीविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, काही लोक संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणतात. मात्र, दुसरीकडे काही लोक स्वतःलाच धर्मवीर म्हणतात. काही लोकांवर तर चित्रपटही निघाले आहेत. त्याचा दुसरा पार्टही येणार आहे. जर संभाजी महाराज धर्मवीर असतील, तर दुसरे धर्मवीर होऊ शकणार नाहीत. त्यामुळे दुसऱ्या कुणाला स्वराज्य रक्षक म्हणता येणार नाही, असे माझं मत आहे, असेही अजित पवार म्हणाले.

मी काहीही चूक केली नाही

मी खूप काही मोठी चूक केलेली नाही. मी माझी भूमिका मांडली. ज्याला योग्य वाटेल त्याने स्वीकारा. ज्याला योग्य वाटत नसेल त्यांनी सोडून द्यावे. त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे, असेही पवार म्हणाले. महापुरुषांबद्दल भाजपच्या नेत्यांनी जी विधाने केली, त्यामुळे जे वातावरण महाराष्ट्रात निर्माण झाले, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ही टूम काढली आहे, अशी टीकाही अजित पवार यांनी यावेळी केली.

आंदोलनासाठी भाजपच्या सूचना

भाजपच्या लोकांना आंदोलनासाठी खास सूचनाही देण्यात आलेल्या होत्या. माझे कसे फोटो वापरायचे. त्यावर फुली असली पाहिजे असेही पवार यांनी सांगितले. आंदोलनाचे फोटो काढून ते ऑफिसला पाठवायचीही सूचना होती असे एकाने मला सांगितले, असेही अजित पवार म्हणाले.

एक ग्रुप ठरवतो

एक ग्रुप आहे, तो बसतो आणि ठरवतो की आता कोणत्या मुद्द्यावर लक्ष्य करायचे असेही एका प्रश्नाच्या उत्तरात अजित पवार म्हणाले. त्या मास्टरमाईंडच्या कल्पनेतून हे निघाले, मग आदेश निघाले की असे आंदोलन करा. फोटो जाळा, असे फोटो काढा. चपलेने मारा. चपलेने मारा म्हणजे फोटोला मारा, असा चपलेने मारला तर ऐकतोय हो मी असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

मी कधीही चुकीचे बोललो नाही

अजित पवार म्हणाले, मी कधीही, कोणत्याही महापुरुषांबद्दल चुकीचे बोललो नाही. मात्र, त्याच्याआधी राज्यपाल महोदयांनी राष्ट्रपुरुषांचा अपमान केला होता. बेताल वक्तव्य केले होते. ते मी रेकॉर्डवर आणले. मला कळत नाही भाजपचे लोक आंदोलन करत आहेत. माझा राजीनामा मागण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. मला विरोधी पक्षनेतेपद त्यांनी दिलेले नसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिले आहे. त्यामुळे त्या राजीनाम्याचा प्रश्न नाही.

मला भाजपच्या अनेक नेत्यांचे फोन

दुसरीकडे मला भाजपचे कित्येक मंत्री, नेते, खासदारांचे फोन आले. ते मला म्हणाले की, दादा आम्हाला सांगितले आहे की तुमच्याविरोधात आंदोलन करा, तुमचा राजीनामा मागा, तुम्ही चुकीचे बोलल्याबद्दल. आता आम्हालाही कळत नाही की, तुम्ही काय चुकीचे बोलला. आंदोलनाचा काय पॅटर्न असला पाहिजे हेही सांगितले. आंदोलनाचा मायनाच त्यांनी सांगितला. कसे आंदोलन करायचे. कसा फोटो वापरायचा. पुन्हा आंदोलनाचे फोटो काढून परत ऑफिसला पाठवायचे असेही अजित पवार यांनी सांगितले.

भाजप नेत्यांनीच माफी मागावी

आंदोलन करणाऱ्यांना किंवा त्यांना आंदोलन करणाऱ्यांना मला विचारायचे आहे की, महापुरुषांचा अपमान, शब्दप्रयोग वापरून, बेताल वक्तव्य करून हा राज्यपालांनी केला आहे. मंत्रिमंडळातल्या नेत्यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदार आणि नेत्यांनीही शिवाजी महाराजांसोबत तुलना केली. प्रसाद लाड यांनी नवाच जावईशोध लावला. त्यांचे नेते अशी विधाने करत आहेत. त्याच्याबद्दल हे कुणीच बोलायला, दिलगिरी व्यक्त करायला कुणी तयार नाही. याची नोंद राज्याने घ्यावी, असेही अजित पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...