आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी मुंबईतील एका कार्यक्रमात राजस्थानी आणि गुजराती लोकांचे कौतुक करताना या लोकांना मुंबईतून काढल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही, असे वक्तव्य करत पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अपमान केला. यानंतर भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवल्यानंतर राज्यपालांनी शनिवारी दुपारी १२.११ वाजता एका मिनिटाच्या आत ५ ट्वीट करून सारवासारव केली. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांतील कोश्यारींचे हे तिसरे वादग्रस्त वक्तव्य आहे.
शुक्रवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जे.पी. रोड, अंधेरी येथील दाऊदबाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळा झाला. या चौकाला दिवंगत शांतिदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. या वेळी कोश्यारी यांनी हे वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला. दरम्यान, कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली.
राज्यपालांचे स्पष्टीकरण : मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही. मात्र, नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला.
1 मुंबई आणि ठाण्यातील लोकांबाबत
(दि. ३० जुलै २०२२, मुंबई)
“कधी-कधी मी महाराष्ट्रातील लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी सांगितले जाते. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हणताच येणार नाही.
2 छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल
(दि.२७ फेब्रुवारी २०२२, औरंगाबाद)
समर्थांविना छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारेल?
मी शिवाजी महाराज किंवा चंद्रगुप्त यांना छोटे म्हणणार नाही. मात्र, आपल्या समाजामध्ये गुरूचे मोठे स्थान आहे. जर
गुरू असेल तर गुरुदक्षिणा दिली पाहिजे. आपल्या समाजात असे स्थान महत्त्वाचे असते.
3 सावित्रीबाई फुलेंबाबत (दि.१४ फेब्रुवारी २०२२, पुणे)
पुणे विद्यापीठातील कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचे लग्न वयाच्या १० व्या वर्षी करण्यात आले, त्या वेळी त्यांचे पती केवळ १३ वर्षांचे होते. एवढ्या लहान वयात लग्न झाल्यानंतर एक मुलगा आणि मुलगी काय करत असतील?
मराठी माणसामुळेच मुंबई देशाची आर्थिक राजधानी
मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई आर्थिक राजधानी बनली आहे. आम्ही राज्यपालांच्या मताशी असहमत आहोत. राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
राज्याच्या जडणघडणीत मराठी माणसाचे योगदान
महाराष्ट्राच्या इतिहासात मराठी माणसाचे कार्य, श्रेय मोठे आहे. मराठी माणसाने जगभरात नाव कमावले. विविध समाजांचे योगदान नाकारता येणार नाही. मुंबई, महाराष्ट्र व देशाच्या विकासात मराठी माणसाचा सहभाग मोठा आहे.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
इतिहास माहीत नसेल तर उगाच बोलत जाऊ नका
मराठी माणसाला डिवचू नका. आपल्याला इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचे व सन्मानाचे पद आहे. आपल्या वक्तव्याने राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात.
- राज ठाकरे, मनसेप्रमुख
कोश्यारींच्या टोपीचा रंग, अंत:करणात फरक नाही
या राज्यपालांबद्दल काय बोलावं! यापूर्वी त्यांनी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत एक भयानक विधान केले होते. त्यांच्या टोपीचा रंग आणि अंत:करण यात काही फरक नाही.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
राज्यपालांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ
कोश्यारींनी त्यांच्या दोन-अडीच वर्षांच्या काळात सुंदर लेणी, शिवरायांचे गड-किल्ले व इतर सर्व चांगल्या गोष्टी पाहिल्या असतील. मात्र, आता त्यांना कोल्हापूरचा जोडा दाखवण्याचीदेखील वेळ आली आहे.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
राष्ट्रपतींनी कोश्यारींची आता उचलबांगडी करावी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल अनावश्यक वक्तव्य करून मुंबई व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. आता राष्ट्रपतींनी राज्यपालांची उचलबांगडी करावी.
- नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.