आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटीचे वसुली प्रकरण:न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर हजेरीस टाळाटाळ; परमबीर यांच्याविरोधात पुन्हा जामीनपात्र वॉरंट जारी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपप्रकरणी मुंबईचे माजी पोलिस अायुक्त परमबीरसिंग यांच्याविरोधात चांदीवाल चौकशी आयोगाने बुधवारी पुन्हा जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यांना ६ ऑक्टोबरपर्यंत हजर राहण्यास सांगितले आहे. परमबीर यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी आघाडी सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांच्या एकसदस्यीय आयोगाची स्थापना केली होती.

आयोगासमोर चाैकशीला हजर राहण्यासाठी अनेक वेळा समन्स बजावले, मात्र परमबीर हजर झाले नाहीत. अखेर आयोगाने त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावून त्यांना ७ सप्टेंबर रोजी हजर राहण्याची नोटीस दिली होती. तसेच गैरहजेरीबद्दल आयोगाने सिंग यांना जून महिन्यात ५ हजार आणि गेल्या महिन्यात दोन वेळा २५ हजारांचा दंड ठोठावला. त्यानंतरही परमबीर गैरहजर राहिल्याने आता दुसऱ्यांदा वॉरंट जारी केले आहे.

परमबीर यांची मुंबई पोलिस अायुक्तपदावरून उचलबांगडी करून होमगार्डमध्ये बदली केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप केला होता. हे आरोप देशमुख यांनी फेटाळले होते. याप्रकरणी देशमुख यांचीही सीबीआय आणि ईडी चौकशी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...