आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्माळ्याचे नावलौकिक:सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील पांगरे गावात राहणाऱ्या जलतरणपटू सुयश जाधवचा अर्जुन पुरस्काराने गौरव

कंदरएका वर्षापूर्वीलेखक: प्रविण देशपांडे
  • कॉपी लिंक

जिद्द, चिकाटी व मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर सामान्य कुटुंबातील मुलाने गावासह जिल्ह्याचे नाव देशभर उंचावले आहे. पांगरे ता करमाळा येथील सुयश नारायण जाधव याने आजपर्यंत खेळाच्या माध्यमातून नाव उंचावले होतेच. दिव्यांग या प्रकारात पॅरा जलतरणपटू मध्ये त्याने दैदिप्यमान यश मिळवले आहे. त्याची हीच आजवरील कामगिरी लक्षात घेता क्रीडा मंत्रालयाने अर्जुन पुरस्कार घोषित केला आहे. त्याची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या वैभवात भर पडली असून करमाळा तालुक्यातील गौरवात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णझेप घेणाऱ्या सुयशची वाटचाल देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

सुयश जाधव हा मूळचा करमाळा तालुक्यातील पांगरे या गावचा आहे. तो लहान असताना घडलेल्या एका वीज दुर्घटनामध्ये त्याला कायमचे अपंगत्व आले. पण दोन्ही हात नसतानाही त्याने हार न मानता यालाच संधी समजून वडील नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचा सराव सुरू केला. वयाच्या १४-१५ व्या वर्षी त्याने क्रीडा क्षेत्रात पाऊल टाकले. वडीलही हे राष्ट्रीय पातळीवर खेळेलेले असल्याने त्याला त्यांचे मार्गदर्शन व घरातूनच बाळकडू मिळाले. त्याच्या अपार कष्टाने व मेहनतीने सुयशने जलतरण या क्रीडा प्रकारात नैपुण्य प्राप्त केले. त्याचे थक्क करणारे क्रीडाकौशल्य कौतुकास्पद होते. तसेच क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यमुळे राज्य शासनाच्या मानाच्या शिवछत्रपती राज्यस्तरीय पुरस्कारसह अन्य पुरस्कारही त्याला मिळाले. शासनाने त्याचा कार्याचा गौरव करत वर्ग १ च्या जिल्हा क्रीडा आधिकारीपदी नियुक्ती केली आहे. तो सध्या बालेवाडी स्टेडियम, पुणे येथे कार्यरत आहे.

शिवछत्रपती पुरस्कारही त्याने पटकावला आहे. सुयशने स्वतःची छाप टाकत राज्यस्तरीय, राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवलेल्या आहेत. त्याने आतापर्यंत राज्यस्तरीय १०, राष्ट्रीय १०, तर आंतरराष्ट्रीय ११ स्पर्धेत सहभागी झाला असुन या स्पर्धेत राज्यस्तरीय ५१ पदके, राष्ट्रीय स्तरावर ४६ पदके तर आंतरराष्ट्रीय स्तरावर २२ अशी एकूण ११९ पदकांची कमाई केली आहे. तर रियो, ब्राझील येथे झालेल्या आलिम्पिक स्पर्धेत २ सेकंदाने पदकला हुलकावणी दिली. तरीही तो अपयश न मानता मोठ्या धार्याने पुढील स्पर्धेची तयारी करत आहे. टोकियो येथे होणाऱ्या आलिम्पिक स्पर्धेत तो पात्र झालेला आहे. पुढील वर्षी टोकियो २०२१ मध्ये होणाऱ्या आलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकवून देण्याचे त्याचे स्वप्न आहे. रिओ पॅरालिंपिक गेम्स, वर्ल्ड पॅरा स्विमिंग चैम्पीयन्शिप, एशियन पॅरा गेम्स या झालेल्या स्पर्धेत ही त्याने चांगले यश मिळवले आहे.

त्याच्या या सर्व कामगिरीची दखल घेत क्रीडा क्षेत्रात सर्वाकृष्ट समजल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाने त्याची निवड केली आहे. पॅरा जलतरणपटू या प्रकारात अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अर्जुन पुरस्कारपर्यंत मजल मारणारा सुयश सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरणार आहे.

दरम्यान त्याच्या या निवडीचे वृत्त कळताच सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम क्रीडाप्रेमींनी व राजकीय नेते यांनी सुयशवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे. यानिमित्ताने करमाळा तालुक्याचे नाव देशात गाजले आहे.

आई वडिलांच्या कष्टाचे चीज

सुयश लहान असतानाच दुर्घटना घडल्याने आई सविता व वडील नारायण हताश झाले. पण त्यांनीही निराश न होता त्याची पोहण्यातील आवड पाहता त्याला प्रोत्साहन दिले. परिस्थिती बेताचीच असताना शक्य ते सर्व केले. त्यांना अनेक वेळा आर्थिक अडचणीही आल्या. पण याकामी त्यांना अनेकांनी मदत केली. त्यांना सुयशवर पूर्ण विश्वास होता व त्यानेही तो समर्थपणे पार पडला. त्याला यात अनेक पुरस्कार मिळाले. वडील नारायण जाधव यांनी त्याला कसोशीने सर्व शिकवले. तर त्याची आई सविता ह्या सुयशसोबत नेहमीच सावलीसारख्या सोबत राहिल्या. त्या नेहमीच त्याला पाठबळ देत राहिल्या. सुयश दैनंदिन जीवनातील स्वतः ची कामे सर्व स्वतः कामे करतो. तर आता सुयशला क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठा असणारा अर्जुन पुरस्कार मिळण्याने त्यांना आनंदाश्रू आले आहेत. याच साठी केला होता अट्टाहास असे ते नक्कीच म्हणत असणार.

देशातील प्रतिष्ठेच्या असणाऱ्या असणाऱ्या क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यामुळे मला खूप आनंद वाटत आहे. मागील काही वर्षात सातत्याने यश मिळत राहिले. तर आशियाई स्पर्धेत एक सुवर्ण व दोन ब्रॉंझ पदके मिळाली होती. मला याकामी मदत करणारे प्रशिक्षक, मित्र, यांनी मला मोलाची मदत केली आहे. आगामी स्पर्धेत चांगले यश मिळवण्याचा प्रयत्न राहील. सुयश जाधव ,पॅरा जलतरणपटू

बातम्या आणखी आहेत...