आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी अटकेत:प्रेयसीच्या खुनात अटक, आरोपी म्हणाला, पत्नीलाही 2 वर्षांपूर्वीच कायमचे संपवले; बेळगाव येथून अटक, खुनाची दिली कबुली

सातारा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. संतोष पोळनंतर दोन महिलांच्या हत्येने सातारा हादरले

प्रेयसीच्या खुनात अटक केल्यानंतर आरोपीने धक्कादायक कबुली देत दोन वर्षापूर्वी पत्नीला ठार मारून गाडल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसही चक्रावले. पत्नीसह एका महिलेचा खून करून फरार झालेल्या नितीन आनंदराव गोळे (३८) याला भुईंज पोलिसांनी बेळगाव येथून जेरबंद केले आहे. डॉ. संतोष पोळनंतर दोन महिलांचे हत्याकांड उघडकीस आल्याने वाई तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. गोळेने चौकशीदरम्यान पत्नी मनीषा नितीन गोळे (३४, रा. व्याजवाडी, ता. वाई) हिचा दिनांक १ मे २०१९ रोजी खून करून स्वतःच पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दिली होती. तसेच तिचा मृतदेह डोंगर परिसरात पुरून टाकल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली.

त्याचबरोबर प्रेयसी संध्या शिंदे हिचादेखील गळा आवळून खून केल्याचीही कबुली त्याने दिली. धोम येथील डॉ. संतोष पोळने ६ महिलांचा खून करून त्यांना स्वतःच्या अंगण व फार्महाऊसमध्ये खड्डे करून जमिनीत गाडले होते. त्याचाही वाई पोलिसांनी छडा लावला होता. ३१ जुलै रोजी रात्री सातारा येथील संध्या विजय शिंदे या बेपत्ता झाल्याची नोंद सातारा पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. ३ ऑगस्ट रोजी आसले (ता. वाई) येथील उसाच्या शेतात एक मृतदेह आढळला. मृतदेहाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यासोबत सापडलेले आधार कार्ड व इतर कागदपत्रे यांची पडताळणी केली. त्यानंतर संबंधित मृतदेह हा संध्या शिंदे हिचा असल्याचे स्पष्ट झाले होते.

आरोपीला ५ दिवसांची कोठडी
आराेपीकडे चौकशी केली असता मृत संध्या शिंदे व त्याची पत्नी मनीषा नितीन गोळे हिचादेखील खून करून तिचाही मृतदेह त्याने पुरून टाकल्याची कबुली भुईंज पोलिसांना दिली. आरोपीस गुरुवारी वाईच्या न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...