आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंडेनबर्ग अहवालावरून उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीवरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी यांच्या जेपीसी चौकशीची गरज नसल्याचे म्हटल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाला आहे. अशोक चव्हाण यांनी जेपीसीमार्फत चौकशी व्हावी, या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे म्हटले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आपण जेपीसी चौकशीवर ठाम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अदानी प्रकरणावरून महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा उघड झालेत.
काय म्हणाले चव्हाण?
काँग्रेस नेते अशोक चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले की,पूर्ण देशातल्या विरोधी पक्षांनी ही मागणी केली की, जेपीसी झाली पाहिजे. कदाचित पवार साहेबांचे वैयक्तिक मत वेगळे असू शकते. मला माहिती नाही. परंतु जनरल प्रकरण एवढे गंभीर आहे, जेपीसी झाल्याशिवाय ते बाहेर येणार नाही. म्हणून ही मागणी सर्व विरोधी पक्षांनी केली आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेस आणि इतर पक्षही जेपीसी ठाम असल्याचे म्हटले.
राऊतांची सारवासारव
संजय राऊत यांनी आपण जेपीसी ठाम असल्याचे म्हटले. मात्र, दुसरीकडे शरद पवारांच्या वक्तव्यावरून त्यांनी सारवासारवही केली. राऊत म्हणाले, शरद पवारांची ही भूमिका पहिल्यापासूनची आहे. जेपीसीनं काही साध्य होणार नाही. जेपीसीचा अध्यक्ष भाजपचा असतो. त्यात बहुमत भाजपचे असते. जे त्यांना पाहिजे तसाच रिपोर्ट बनवणार आहेत. शरद पवारांनी न्यायालयीन चौकशीचा पर्याय दिला आहे. ममता बॅनर्जी असो, तृणमूल काँग्रेस किंवा एनसीपी अदाणींच्या बाबतीत त्यांचे वेगळे मत असू शकते. परंतु, त्यामुळे विरोधकांच्या एकजुटीत महाराष्ट्रात किंवा राष्ट्रीय स्तरावर कोणतीही फूट पडणार नसल्याची सारवासारव राऊत यांनी केली.
पवार म्हणतात की...
अदानी घोटाळ्याची जेपीसीद्वारे चौकशी करावी, या मागणीसाठी काँग्रेससह विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आणि आजही वेगळी भूमिका मांडली. अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच योग्य राहील, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
अदानींचे योगदान मान्य...
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राला सर्वाधिक वीज अदानींकडूनच मिळते. मी अदानींचे कौतुक करत नाही. मात्र, अदानींचे योगदान मान्य करावे लागेल. पूर्वी टाटा-अंबानींचे नाव घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीका केली जायची. मात्र, नंतर टाटांचे देशासाठी मोठे योगदान आहे, याची जाणीव झाल्यानंतर तशी टीका करणे बंद झाले. आता अदानींचे नाव घेऊन त्याप्रमाणेच टीका केली जात आहे. मात्र, अदानींचेही काही तरी योगदान आहे, हे मान्य करावे लागेल.
मोदी डिग्रीवरूनही मतभेद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरूनही विरोधकांनी घेरायला सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकरणातही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली. चार दिवसांपूर्वी अजित पवार म्हणाले होते की, नरेंद्र मोदी यांनी 2014 ला स्वत:ची इमेज तयार केली. त्यांची डिग्री बघून त्यांना मतदान केले नाही. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत त्यांनी करिश्मा तयार केला. बहुमताचा आदर करायला महत्त्व आहे. तर राज्यात 145 बहुमत असेल तर मुख्यमंत्री होता. राजकारणात डिग्रीचे असे काही नाही संबंध येत नाही.
संबंधित वृत्तः
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.