आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी अधिवेशन:यंदा फक्त दोन दिवसांच्याच सरी; 5 व 6 जुलै रोजी होणार मुंबईत अधिवेशन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीची शक्यता धूसर

कोरोना संकटाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै असे दोन दिवसांचेच होणार आहे. अल्प दिवसांच्या अधिवेशनास विरोधी पक्षनेत्यांनी कडाडून विरोध दर्शवला असून ही तर लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप केला आहे.

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनाच्या प्रांगणात मंगळवारी झाली. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, मंत्रिमंडळातील सदस्य, विधान परिषद आणि संसदीय कार्य विभागाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते. बैठकीत पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजासंदर्भातील तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली. अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांना आरटीपीसीअार कोरोना चाचणी सक्तीची आहे.

गर्दी होऊ नये यासाठी विधिमंडळात मंत्री व राज्यमंत्री यांच्यासोबत एकाच अधिकाऱ्याला प्रवेश असेल. खासगी व्यक्तींना व आमदारांच्या खासगी सचिवांना प्रवेश देण्यात येणार नाही.

सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने सभागृहामध्ये सदस्यांकरिता एका आसनावर एक सदस्य असेल. तसेच प्रेक्षक गॅलरी, विद्यार्थी गॅलरीमध्येदेखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाच्या निवडीबाबत काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात म्हणाले, अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे, यावर सहमतीने लवकरच निर्णय घेण्यात येईल.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ४ फेब्रुवारीला राजीनामा दिला. मात्र अध्यक्षपदाची निवड अजून प्रलंबित आहे. त्यामुळे यंदा पूर्णवेळ अध्यक्ष नसतील. विधानसभा अध्यक्ष निवडावा, असे निर्देश मागच्या अधिवेशनापूर्वी राज्यपालांनी दिले होते. मात्र अद्याप अध्यक्षपद निवड झालेली नाही. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. परिणामी राष्ट्रवादी व सेनेच्या सहमतीने काँग्रेसला अध्यक्षपदाचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप करत सभात्याग
आघाडी सरकारने अधिवेशन कालावधी कमी करत लोकशाहीचा बळी दिला. कोरोनाचा बहाणा करत सरकार चर्चेपासून पळ काढत आहे. राजकीय पक्षांच्या कार्यालयाची उद्घाटने गर्दीने करता, मग अधिवेशन अल्प का? ओबीसी व मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन सोडाच, आहे ती अधिवेशनेही सरकारला नको आहेत, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच सरकारच्या निर्णयाचा निषेध करत विरोधी पक्षनेत्यांनी सभात्याग केला.

१. अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२० : २३ फेब्रुवारी ते १४ मार्च : ८३ तास १४ मिनिटे. (२० दिवस) 2. पावसाळी अधिवेशन २०२० : ३ ते ४ आॅगस्ट, कामकाज १० तास ५४ मिनिटे. (फक्त दोन दिवस) ३. हिवाळी अधिवेशन २०२० : १४ ते १५ डिसेंबर, कामकाज १० तास २५ मिनिटे. (२ दिवस) ४. अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१ : १ ते १० मार्च, कामकाज ५ तास. (१० दिवस.)

बातम्या आणखी आहेत...