आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:तेलगाव पाटीजवळ भरधाव कारने पोलीस कर्मचाऱ्यास जिवे मारण्याचा प्रयत्न, हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत ते परभणी मार्गावर तेलगाव पाटीजवळ बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक करणाऱ्या स्विफ्टकार च्या चालकाने पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध शनिवारी ता. २५ पहाटे हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परभणी येथून एका स्विफ्ट कारमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, उपनिरीक्षक आकाश सरोदे, जमादार गणेश लेकुळे यांच्या पथकाने रात्री नऊ वाजता तेलगाव पाटीजवळ वाहनांची तपासणी सुरु केली.

यावेळी परभणी कडून येणारी एक स्विफ्ट कार पोलिसांनी सदर कार थांबवली. त्यानंतर चालक नंदकिशोर द्वारकालाल जयस्वाल याच्याकडे चौकशी सुरू केली. त्याने नाव सांगून कार सुरू केली. जयस्वाल हा कार सह पलायन करत असलेल्या लक्षात येताच जमादार गणेश लेकुळे हे कार समोर उभे राहिले. मात्र चालक जयस्वाल याने भरधाव वेगाने कार जमादार लेकुळे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून त्यांनी बाजूला उडी मारल्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली. मात्र यातून ते बालंबाल बचावले. पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी भरधाव वेगाने कार चालवण्याचा प्रयत्नात चालक जयस्वाल याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार काही अंतरावर जाऊन खड्ड्यात पडली. मात्र त्यानंतरही चालक जयस्वाल यांने अंधाराचा फायदा घेऊन कारमधून उतरून पलायन केले.

त्यानंतर पोलिसांनी सदर कार जप्त करून हट्टा पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे ४० हजार रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी कारसह दारूचा साठा असा सुमारे सव्वा सात लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी जमादार लेकुळे यांच्या तक्रारीवरून कारचालक नंदकिशोर जयस्वाल (रा.आडगाव रंजेबुवा ता. वसमत ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक आकाश सरोदे पुढील तपास करीत आहेत.