आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत भालेराव स्मृती पुरस्कार:डॉ. आनंद नाडकर्णी यांना 2021 चा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्भीड व धडाडीचे पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक अनंत भालेराव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ठेवण्यात आलेला 2021 चा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार मानसोपचार तज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांना जाहीर झाला आहे. 14 नोव्हेंबर रोजी अनंतरावांच्या जयंतीदिनी हा पुरस्कार जाहीर कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या कार्यवाह डॉ. सविता पानट यांनी दिली आहे.

दै. मराठवाडाचे संपादक अनंत भालेराव यांच्या पहिल्या स्मृतिदिनापासून (१९९२ पासून) अनंत भालेराव स्मृति पुरस्कार देण्याची सुरुवात त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या प्रतिष्ठानने केली. पत्रकारिता, साहित्य, कला, समाजसेवा अशा विविध क्षेत्रातील एका नामवंत व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. पहिलाच पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांना देण्यात आला. कुमार केतकर, अरूण टिकेकर, पी. साईनाथ हे ज्येष्ठ पत्रकार; विजय तेंडूलकर, महेश एलकुंचवार यांच्यासारखे नाटककार; मंगेश पाडगांवकर, ना.धो. महानोर यांसारखे प्रतिभावंत कवी, डॉ. सुधीर रसाळांसारखे व्यासंगी समिक्षक, ग.प्र.प्रधान, मृणाल गोरे, मेधा पाटकर, अभय बंग, पुष्पा भावे, थोर गांधीवादी गंगाप्रसादजी अग्रवाल, नरेंद्र दाभोळकर ही सामाजिक राजकीय क्षेत्रातील मोठी माणसे, अनिल अवचट, हार्मोनिअम वादक अप्पा जळगांवकर, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, शिक्षणतज्ज्ञ द.ना.धनागरे, चित्रपट नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, हिमरू तज्ज्ञ अहमद कुरेशी यांच्यासारख्या महनिय व्यक्तिमत्वांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

यंदा हा पुरस्कार मानसोपचार, मनोविकार, व्यसनमुक्ती, नाट्यलेखन, समुपदेशन या क्षेत्रात अविरत कार्यरत असलेले तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांना दिला जाणार आहे. 50 हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ. आनंद नाडकर्णी यांची निवड अनंत भालेराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकरराव मुळे, कोषाध्यक्ष डॉ. प्रभाकर पानट, सचिव डॉ. सविता पानट, सदस्य डॉ. सुधीर रसाळ, न्यायमुर्ती नरेंद्र चपळगांवकर, प्राचार्य प्रताप बोराडे, डॉ. सुनीती धारवाडकर, अशोक भालेराव, प्रा. विजय दिवाण, संजीव कुलकर्णी, बी.एन.राठी, श्रीकांत उमरीकर, मंगेश पानट यांनी एकमताने केली.

बातम्या आणखी आहेत...