आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:नवरात्रोत्सवात माहूरगडावर खासगी वाहनांना बंदी; राज्य परिवहन मंडळाच्या 80 बसेसची व्यवस्था, 250 पोलिसांवर सुरक्षेची मदार

नांदेड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक व मूळपीठ म्हणून प्रख्यात असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील श्री रेणुकागडावर आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी म्हणजेच ७ ते १५ ऑक्टोबरदरम्यान शारदीय नवरात्र महोत्सव साजरा केला जाणार आहे. या कालावधीत पहाटे ५ ते रात्री १० या वेळेत दर्शनासाठी मंदिर उघडे राहील. दर तासाला एक हजार भाविकांना दर्शन घेता येईल, असे नियोजन प्रशासनाने केले आहे.

भाविकांनी सुरक्षित अंतर राखणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य केले आहे. तसेच खासगी वाहनांना गडावर बंदी असून राज्य परिवहन विभागाने माहूर येथून गडावर जाण्यासाठी ८० बसेसची व्यवस्था केली आहे, तर २५० पोलिसांवर भाविकांची सुरक्षा व्यवस्था असणार आहे. माहूर श्री रेणुकादेवी संस्थानचे सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. ४) तहसील कार्यालयात नियोजन बैठक पार पडली. नगरपंचायतकडून पार्किंगच्या ठिकाणी पाण्याचे टँकर, फिरते शौचालय, नियंत्रण कक्ष व मातृतीर्थ तलाव येथे जीवरक्षक दलाची व्यवस्था करण्यात आल्याचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी सांगितले.

तीन ठिकाणांवरून मिळणार बस : राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात ८० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. रेणुकादेवी, पार्किंगच्या ठिकाणावरून व टी पॉइंट असे तीन थांबे भाविकांच्या गडावरून ने-आण करण्यासाठी नियोजित केल्याचे आगारप्रमुख धूतमल यांनी सांगितले. मंदिर परिसरात प्रसाद, महाप्रसाद भाविकांना देण्यात येणार नाही. या यात्रेचे नैसर्गिक आपत्तीचा धोका लक्षात घेऊनच सर्व विभागाने नियोजन करावे.

वीस बेडच्या स्वतंत्र वॉर्डाची व्यवस्था : माहूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व्ही. एन. भोसले यांनी यात्रा काळात २० बेडचे संपूर्ण वॉर्ड, आपत्कालीन सेवेसाठी ३ रुग्णवाहिका आरक्षित करण्यात आल्या. आवश्यक औषध-गोळ्याचा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी मंदिर परिसरात कोविडसंदर्भात जनजागृती करणारे फलक व लसीकरण कॅम्प आयोजित करण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना केल्या.

बातम्या आणखी आहेत...