आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणे विरुद्ध सेना "सामना’:जनआशीर्वाद यात्रेच्या समारोपाला कोकणात राजकारण तापले; सेना-भाजपमध्ये बॅनरबाजी; कणकवलीत पुन्हा भाजप आणि शिवसेना आमने-सामने

रायगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोकणातली माणसे केंद्राचेही ऐकत नाहीत - उदय सामंत

जिल्ह्यामध्ये सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दौरा संपतानाच शिवसेना- भाजपत बॅनर वॉर रंगत आहे. देवगडमध्ये लागलेल्या भाजपच्या बॅनरला शिवसेनेने कणकवलीत बॅनरने उत्तर दिले आहे. यामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

कणकवलीत शिवसेनेचे बॅनरने उत्तर
सेनेच्या या बॅनरच्या वरील बाजूला स्वर्गीय बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे १९ ऑक्टोबर २०१४ रोजी “जायंट किलर” असा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरवर निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार वैभव नाईक यांना कार्यकर्त्यांनी विजयोत्सवात उचलून घेतानाच्याही फोटोचाही समावेश आहे. तर बॅनरच्या एका बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद देतानाचा फोटो आहे. त्यामुळे देवगड येथे लागलेल्या “त्या” बॅनरला बॅनरनेच शिवसेनेकडून कणकवलीत उत्तर दिल्याचे बोलले जात आहे. हा बॅनर सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात अंतिम टप्प्यात असतानाच कणकवली शिवसेनेच्या जुन्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ लावलेल्या बॅनरमुळे पुन्हा एकदा कणकवलीतील राजकीय वातावरण तापणार आहे.

देवगडमध्ये झळकले भाजपचे बॅनर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॅनर वॉर रंगू लागले आहे. देवगड येथे लावलेला बॅनर “ते असतानाही नाही, संपवू शकले, ते आता काय संपवणार” “दादा’गिरी” या मथळ्याखाली बॅनर लागल्यानंतर आता शिवसेनेकडूनही त्याला कणकवलीत चोख प्रत्युत्तर दिले गेले आहे. “ते राज्यात मंत्री असताना कोकणात पराभूत केले, ते केंद्रात मंत्री होऊन काय फरक पडणार” अशा आशयाचा बॅनर कणकवलीत शिवसेना जुन्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ लावण्यात आला आहे. हा बॅनर सध्या कणकवलीत चर्चेचा विषय बनला आहे.

कोकणातली माणसे केंद्राचेही ऐकत नाहीत : उदय सामंत यांची राणेंवर नामोल्लेख न करता टीका
कोकणातील काही लोक केंद्र सरकारने जे सांगितले आहे, तेही ऐकत नाहीत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षेसाठी केलेले सर्व नियम पायदळी तुडवतात. त्यांच्या यात्रा सुरू असताना पोलिस आणि प्रशासनासमोर कोरोना नियमावलीची पायमल्ली होते. त्यामुळे यात्रा आयोजकांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होत आहेत, अशा शब्दांत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी पुण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांना प्रत्युत्तर दिले. सामंत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले, राजकीय नेत्यांच्या जनआशीर्वाद यात्रांदरम्यान खूप गर्दी असते. मास्क न लावता मंडळी सहभागी होतात. सुरक्षेचे नियम बाजूला पडतात. अंतर राखले जात नाही.

केंद्र सरकारने यासाठी नियमावली ठरवून दिली आहे. पण केंद्र सरकारचे मंत्रीच या नियमांचे अशा उपक्रमातून उल्लंघन करतात. त्यांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. तिसऱ्या लाटेचा धोका असताना नियमावली काटेकोरपणे पाळलीच पाहिजे. पण कोकणातली काही माणसे ऐकत नाहीत. त्याला काय करायचे?‘मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे. अधिकाऱ्यांकडून मी सर्व माहिती घेतली आहे. घोषणाबाजी झाली, तेथील दोन्ही बाजूंच्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री जे सांगत आहेत, ते केंद्र सरकार ऐकते. पण काही मंडळींना केंद्राचेही ऐकायचे नाही, त्यामुळे त्यांच्यावर करावी,’ असेही सामंत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...